जळगाव : काहींना सरकारी नोकरी असूनही पैशांची हाव कमी होत नाही. आणखी पैशा हवा याकरीता ते लाच घेत असातात आणि लाच घेऊन ते आपल्या खात्याचं नाव धुळीस टाकतात. अशाच जळगावमधील एक प्रकरण समोर आले आहे. अवघ्या 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकलेल्या जिल्हा परिषद अधिकाऱ्याच्या घराची आणि बँक लॉकरची झडती घेण्यात आली. या कारवाईत तब्बल 5 कोटी 16 लाख रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता आढळून आली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/05/will-the-number-of-vacancies-in-the-mpsc-group-c-examination-reach-16000/
10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक
जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सतीश मन्सुलाल शिसोदे यांना 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ACB ने रंगेहात पकडले होते. रस्त्याच्या कामाचे 10 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या शिसोदे यांच्या घराची आणि बँकेतील लॉकरची तपासणी करण्यात आली.
घरात आणि लॉकरमध्ये कोट्यवधींची संपत्ती
ACB च्या झडतीदरम्यान शिसोदे यांच्या नावावर आणि ताब्यात असलेल्या मालमत्तेची माहिती समोर आली. या कारवाईत एकूण 5 कोटी 16 लाख 88 हजार 389 रुपयांची मालमत्ता आढळल्याचे समोर आले आहे. यात आदर्शनगर परिसरातील दोन घरे आणि 7 लाख 97 हजार रुपयांची रोकड सापडली.
विशेष म्हणजे, बँकेच्या लॉकरमध्ये मोठ्या प्रमाणात दागिने आढळले. त्यांची किंमत सुमारे 3 कोटी 74 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या दागिन्यांमध्ये 2,524 ग्रॅम सोने, 11,633 ग्रॅम चांदी आणि 101 ग्रॅम प्लॅटिनमचा समावेश आहे.
संपत्तीच्या स्रोताची होणार चौकशी
इतक्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता आढळल्यानंतर ACB कडून तिच्या स्रोताची पडताळणी केली जाणार आहे. संबंधित अधिकाऱ्याचे ज्ञात उत्पन्न, आर्थिक व्यवहार आणि मालमत्ता मिळवण्यासाठी वापरलेल्या पैशांचा स्रोत तपासला जाणार आहे. अवघ्या 10 हजार रुपयांच्या लाचप्रकरणातून कोट्यवधींची संपत्ती समोर आल्याने जळगावमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.