अहिल्यानगर: राज्यात 2026-27 च्या ऊस गाळप हंगामाला वेग आला असून, यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच अहिल्यानगर जिल्ह्याने साखर उत्पादनात दमदार कामगिरी नोंदवली आहे. 1 नोव्हेंबरअखेर जिल्ह्यातील 20 साखर कारखान्यांनी मिळून तब्बल 16.61 लाख टन उसाचे गाळप केले असून, त्यातून 13.05 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 7.86 टक्के नोंदविण्यात आला आहे. राज्यातील एकूण साखर उत्पादनात अहिल्यानगर विभागाचा महत्त्वाचा वाटा असून, साखर उत्पादनाच्या बाबतीत जिल्ह्याने सुरुवातीपासूनच आघाडीच्या विभागांमध्ये स्थान मिळवले आहे.
साखर आयुक्त कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 1 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील 124 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असून, त्यामध्ये 60 सहकारी आणि 64 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी आतापर्यंत एकूण 97.46 लाख टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. त्यातून 77.07 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, राज्याचा सरासरी साखर उतारा 7.91 टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. मागील वर्षी याच तारखेपर्यंत राज्यात केवळ 53 कारखाने सुरू झाले होते. यंदा मात्र 124 कारखान्यांनी गाळप सुरू केल्याने हंगामाने सुरुवातीलाच चांगली गती घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
https://www.prahaar.in/2026/11/04/12-major-decisions-by-the-cabinet-significant-relief-for-students-vehicle-owners-and-farmers/
अहिल्यानगर विभागातील 20 कारखान्यांपैकी 11 सहकारी आणि 9 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थिती, पावसातील अनियमितता आणि ऊस उत्पादनावर झालेला परिणाम या पार्श्वभूमीवर गाळप हंगामाकडे विशेष लक्ष लागले आहे. ऊस उपलब्धता, कारखान्यांची गाळप क्षमता आणि साखर उतारा या तीनही बाबी यंदाच्या हंगामासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यातील उत्पादनाची आकडेवारी समाधानकारक असली तरी संपूर्ण हंगामातील कामगिरी कशी राहते, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
राज्यातील विभागनिहाय कामगिरी पाहता पुणे विभागाने साखर उत्पादनात सर्वाधिक आघाडी घेतली आहे. पुणे विभागातील 22 कारखान्यांनी आतापर्यंत 27.08 लाख टन उसाचे गाळप करून 23.60 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा सरासरी साखर उतारा 8.71 टक्के आहे. सोलापूर विभागातील 27 कारखान्यांनी 17.81 लाख टन उसाचे गाळप करून 13.12 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून, विभागाचा उतारा 7.37 टक्के आहे. कारखान्यांच्या संख्येच्या बाबतीत सोलापूर विभाग राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.
https://www.prahaar.in/2026/11/04/maharashtra-healthcare-boosted-with-1440-new-doctors-deputy-cm-eknath-shinde-urges-them-to-win-public-trust/
नांदेड विभागातील 26 कारखान्यांनी 13.06 लाख टन उसाचे गाळप करून 9.12 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. या विभागाचा सरासरी उतारा 6.98 टक्के इतका आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील 14 कारखान्यांनी 11.89 लाख टन उसाचे गाळप केले असून, त्यातून 8.47 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. या विभागाचा उतारा 7.12 टक्के आहे. अमरावती विभागातील दोन खासगी कारखान्यांनी 1.31 लाख टन उसाचे गाळप करून 95 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून, विभागाचा उतारा 7.25 टक्के आहे. मात्र, ऊसदराचा तोडगा न निघाल्याने अन्य कारखाने गाळप सुरू करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे नागपूर विभागात अद्याप एकाही साखर कारखान्याने गाळप सुरू केलेले नाही.
यंदाच्या हंगामात राज्यभरात कारखान्यांची संख्या वाढल्याने साखर उत्पादनाची गती वाढली असली, तरी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ऊस उपलब्धता आणि साखर उतारा हे महत्त्वाचे मुद्दे राहणार आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे उसाच्या वाढीवर आणि वजनावर परिणाम होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम आगामी काळातील गाळप आणि साखर उत्पादनावर होऊ शकतो. त्यामुळे कारखान्यांनी गाळपाचे नियोजन करताना शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपासाठी घेणे, वाहतूक आणि तोडणीचे योग्य नियोजन करणे तसेच शेतकऱ्यांना वेळेत ऊसदराची रक्कम अदा करणे आवश्यक ठरणार आहे. हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात 13.05 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्याची पुढील काळातील कामगिरी राज्याच्या साखर उद्योगासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/04/nashik-these-six-people-have-a-chance-to-apply-for-the-post-of-corporator-approved-by-bjp/
कोल्हापूर विभागाचा उतारा सर्वाधिक
कोल्हापूर विभागात मात्र ऊसदराच्या प्रश्नामुळे गाळप हंगामाला अपेक्षित गती मिळालेली नाही. या विभागातील आतापर्यंत 13 कारखान्यांनी गाळप सुरू केले असून, त्यामध्ये 9 सहकारी आणि 4 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी 9.70 लाख टन उसाचे गाळप करून 8.76 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे, कोल्हापूर विभागाचा 9.03 टक्के साखर उतारा राज्यात सर्वाधिक आहे.