Home देश ईडीचा दणका! केरळ ते तामिळनाडू 11 ठिकाणी धाडी, ‘आप’ आमदाराच्या घरीही झाडाझडती

ईडीचा दणका! केरळ ते तामिळनाडू 11 ठिकाणी धाडी, ‘आप’ आमदाराच्या घरीही झाडाझडती

0
ईडीचा दणका! केरळ ते तामिळनाडू 11 ठिकाणी धाडी, ‘आप’ आमदाराच्या घरीही झाडाझडती
ईडीची मोठी कारवाई (Photo: Social Media)

नवी दिल्ली: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लाँडरिंग प्रकरणाविरोधात आक्रमक पावले उचलत मोठी कारवाई केली आहे. बुधवारी सकाळीच केंद्रीय यंत्रणेने केरळ, पंजाब आणि तामिळनाडू या तीन राज्यांमध्ये एकाच वेळी धडक सत्र राबवत तब्बल 11 ठिकाणी छापेमारी केली. सहकारी संस्थेच्या निधीत कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, पंजाबमधील ‘आप’ आमदाराच्या निवासस्थानीही तपास यंत्रणेने धाड टाकल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सहकारी संस्थेच्या निधीचा मोठा अपहार

मिळालेल्या माहितीनुसार, ‘भारत लझना मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) आर. प्रेमकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संबंधित आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणातून ही छापेमारी सुरू आहे. प्रेमकुमार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सर्वसामान्य ठेवीदारांनी सोसायटीमध्ये कष्टाने जमा केलेले कोटींचे फंड्स स्वतःच्या पत्नी आणि नातेवाईकांच्या बँक खात्यात वळवले असल्याचा गंभीर आरोप ईडीने केला आहे. हा निधी वैयक्तिक कामांसाठी वापरल्याचा संशय आहे.

तपासात असेही समोर आले आहे की, प्रेमकुमार यांनी सोसायटीच्या मालकीचे ‘रागम थिएटर’ एका संस्थेकडे तारण ठेवले होते, मात्र त्या व्यवहारातून मिळालेली मोठी रक्कम सोसायटीच्या अधिकृत खात्यात जमाच केली नाही. याशिवाय, तामिळनाडूतील कांचीपुरम येथे पत्नीच्या नावावर तब्बल 500 एकर जमीन खरेदी केल्याची माहितीही समोर आली असून, या सर्व आर्थिक गैरव्यवहाराची साखळी जोडण्याचे काम सध्या सुरू आहे.

https://www.prahaar.in/2026/11/04/new-recruitment-policy-in-haryana-government-jobs-only-indian-citizens-to-get-preference-now/

‘आप’ आमदाराच्या निवासस्थानीही धडक

या कारवाईदरम्यान ईडीच्या पथकाने पंजाबमधील मोगा येथील ‘आम आदमी पार्टी’च्या (आप) आमदार अमनदीप कौर अरोरा यांच्या फ्लॅटवरही अचानक छापा टाकला. ही झाडाझडती सुमारे दोन तास चालली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

देशभरात ईडीच्या कारवायांना वेग

गेल्या काही दिवसांत देशभरात आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणांवर अंकुश ठेवण्यासाठी ईडीने आपला वेग वाढवला आहे. काही दिवसांपूर्वीच पंजाबमधील होशियारपूर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुंदर शाम अरोरा यांच्या घरी झडती घेण्यात आली होती. तसेच, श्रीनगरमध्ये दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक पुरवठा केल्याच्या प्रकरणात चार ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. याशिवाय, अनिल अंबानी समूहाशी संबंधित बँक फसवणूक प्रकरणात 510 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्याची मोठी कारवाईही यंत्रणेकडून नुकतीच पार पाडण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here