मुंबई: महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक आहे. एकाच वेळी 1440 नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी सेवेत दाखल होत असून, त्यांच्या माध्यमातून राज्याच्या आरोग्य यंत्रणेला मोठे बळ मिळणार आहे. डॉक्टर होणे ही केवळ पदवी आहे; मात्र डॉक्टर म्हणून समाजाचा विश्वास संपादन करणे हीच खरी कमाई आहे. रुग्णाला औषधोपचारांबरोबरच मानसिक आधार देऊन त्याच्या चेहऱ्यावर समाधान आणणे हे डॉक्टरांचे खरे यश आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी गट-अ यांच्या नियुक्ती आदेश वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक, खासदार संजय जाधव, आमदार प्रा. मनिषा कायंदे, आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर आणि आरोग्य विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, या 1440 डॉक्टरांमध्ये सुमारे 700 महिला डॉक्टर असून, तरुणाईचा उत्साह आरोग्यसेवेत दिसला पाहिजे. पारदर्शक आणि गुणवत्तेच्या आधारे झालेली ही भरती कौतुकास्पद आहे. यापूर्वी ग्रामीण भागात एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता जाणवत होती. आता ही डॉक्टरांची फौज आरोग्यसेवेला गती देईल. आवश्यकतेनुसार आणखी भरतीही झाली पाहिजे.
डॉक्टरांकडून उत्तम सेवा अपेक्षित असेल तर त्यांना दर्जेदार निवास, स्वच्छ परिसर, शुद्ध पाणी, मुबलक औषधे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर आणि आवश्यक उपकरणे दिली पाहिजेत. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांच्या वसतिगृहांची दुरवस्था पाहून तीन महिन्यांत दर्जेदार व्यवस्था उभारण्याचे निर्देश दिले होते. डॉक्टरांच्या सुविधांबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही शासनाचे कर्तव्य आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
https://www.prahaar.in/2026/11/04/95-percent-of-farmers-to-receive-aid-before-diwali-chief-minister-devendra-fadnavis-funds-already-credited-to-the-accounts-of-7-3-million-73-lakh-farmers-so-far/
आरोग्यमंत्री असताना कोल्हापूरचा महापूर, साथीचे आजार, गडचिरोली आणि मेळघाटमध्ये प्रत्यक्ष जाऊन आरोग्यसेवेचा आढावा घेतला. फाईलींच्या चक्रात निर्णय अडकवण्यापेक्षा ‘नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन’ या भूमिकेतून तातडीने सुविधा दिल्या पाहिजेत. मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 560 कोटी रुपये गरजू रुग्णांना दिले. डॉ. दीपक सावंत यांनी मेळघाटमधील कुपोषणावर केलेले कामही उल्लेखनीय असल्याचे शिंदे म्हणाले.
राज्यात तीन कोटी महिलांची तपासणी झाली असून, वाढदिवसानिमित्त आठ मॅमोग्राफी व्हॅन गावागावांत पाठविण्यात आल्या. आधुनिक रुग्णवाहिकाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची उपचार मर्यादा पाच लाखांवरून 22 लाखांपर्यंत वाढविण्यात आली असून, 12.50 कोटी नागरिकांना विमा संरक्षण दिले आहे. डायलिसिस, हृदयविकार, प्रत्यारोपण आणि कर्करोगावरील उपचारांचाही समावेश आहे.
कोविड काळात डॉक्टरांनी जीव धोक्यात घालून सेवा केली. स्वतः पीपीई किट घालून रुग्णालयांत जाऊन रुग्णांना धीर दिला होता. डॉक्टरांनी प्रत्येक रुग्णाला समान वागणूक द्यावी. रुग्णांशी आपुलकीने संवाद साधल्यास अर्धा आजार दूर होतो. वैद्यकीय शिक्षणातील मेहनतीचे उदाहरण म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या एमबीबीएस आणि एमएस शिक्षणाचाही त्यांनी उल्लेख केला.
उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉक्टरांना दरवर्षी पुरस्कार द्यावेत. त्यांच्या कामगिरीची नोंद वार्षिक गोपनीय अहवालातही व्हावी, अशी सूचना त्यांनी केली. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाला देशात प्रथम क्रमांकावर नेण्याचे ध्येय ठेवून समर्पण आणि सेवाभावाने काम करा, असे आवाहन करून शिंदे यांनी सर्व नवनियुक्त डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या.