Home ब्रेकिंग न्यूज Raj Thackeray : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा दीपोत्सव रद्द

Raj Thackeray : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा दीपोत्सव रद्द

0
Raj Thackeray : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा दीपोत्सव रद्द
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा दीपोत्सव रद्द (Google photo)

मुंबई : राज्यातील दुष्काळाची तीव्रता आणि ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा शिवाजी पार्कवर दीपोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत एका बाजूला ग्रामीण भागातील नागरिक संकटाचा सामना करत असताना दुसरीकडे मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करणे मनाला पटत नसल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा निर्णय जाहीर केला. तसेच दिवाळी साजरी करताना रोषणाई आणि फटाक्यांवरील खर्चाला आवर घालण्याचे आवाहनही त्यांनी राज्यातील नागरिकांना केले.

https://www.prahaar.in/2026/11/04/shyamkumar-this-behavior-is-not-right-congress-mp-slaps-a-female-mp-video-goes-viral/

मनसेकडून दरवर्षी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आकर्षक रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह दीपोत्सव साजरा केला जातो. हा सोहळा पाहण्यासाठी मुंबई, ठाण्यासह राज्याच्या विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने येतात. मात्र, यंदा महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीमुळे हा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे राज ठाकरे यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे स्पष्ट केले. राज्यातील ३५८ पैकी ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, सुमारे १४१.५३ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा उल्लेखही या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दुष्काळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शहरांमध्ये मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी होत असल्याचे चित्र ग्रामीण भागातील संकटाचा सामना करणाऱ्या नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना काय वाटत असेल, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा, असे राज ठाकरे म्हणाले. १९७२ पेक्षाही मोठा दुष्काळ पडण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली असतानाही सत्ताधारी पक्षातील नेत्यांना परिस्थितीचे गांभीर्य उमगले नसल्याची टीकाही त्यांनी केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उत्सव साजरा करणे आपल्याला योग्य वाटत नसल्याने मनसेने यंदाचा दीपोत्सव रद्द केल्याचे त्यांनी सांगितले.

यंदा काळी दिवाळी साजरी करण्याची गरज नाही. दिवाळीचा आनंद कायम ठेवत कंदील लावावेत, फराळाचे वाटप करावे; मात्र रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीवर नियंत्रण ठेवावे, अशी विनंती राज ठाकरे यांनी केली. महाराष्ट्रातील नागरिक संकटात असताना मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करणे योग्य नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःहून उत्साहाला मर्यादा घालावी, असेही ते म्हणाले. पुढील वर्षी परिस्थिती सुधारेल आणि पुन्हा मोठ्या उत्साहात दिवाळी व दीपोत्सव साजरा करता येईल, अशी आशा व्यक्त करत त्यांनी राज्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here