Nashik Crime : वाहतूक पोलीस असल्याचे भासवून वाहनचालकांकडून पैशांची मागणी करणाऱ्या एका इसमाचा प्रकार पिंपळगाव बसवंत येथे उघडकीस आला आहे. स्वतःकडे कोणताही शासकीय अधिकार नसताना वाहतूक पोलिसांचा गणवेश परिधान करून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात संबंधित इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चिंचखेड चौफुली येथील सर्व्हिस रोडवर हा प्रकार घडला. आकाश बाळासाहेब क्षीरसागर (रा. ओझर) याने वाहतूक पोलीस असल्याचे भासवून वाहनचालकांकडे पैशांची मागणी केल्याचे निदर्शनास आले.
वाहनचालकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न
विशेष म्हणजे, संबंधित इसमाने अंगावर महाराष्ट्र पोलीस असा बॅज, वाहतूक पोलिसांचा लोगो असलेला गणवेश, खाकी रंगाची पँट आणि काळ्या रंगाचा बेल्ट परिधान केला होता. तसेच हातात पांढऱ्या रंगाचे मशीन घेऊन तो वाहनचालकांना वाहतूक पोलीस असल्याचा आभास निर्माण करीत होता. या माध्यमातून वाहनचालकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले.
दरम्यान, संबंधित आरोपी यापूर्वी नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात ट्रॅफिक वॉर्डन म्हणून काम करीत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. मात्र, पिंपळगाव बसवंत परिसरात कोणताही अधिकृत शासकीय अधिकार नसताना वाहतूक पोलीस असल्याचे भासवून पैसे मागण्याचा प्रकार त्याने केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम २०४ व ३०८(२) प्रमाणे दि. २ नोव्हेंबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निकम (ब.नं. ७७१) पुढील तपास करीत आहेत.
अधिकृत पदाचा गैरवापर करून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या अशा प्रकारांमुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वाहतूक नियमांच्या नावाखाली कोणी अनधिकृत व्यक्ती पैशांची मागणी करीत असल्यास नागरिकांनी सतर्क राहून तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.