Home महाराष्ट्र ठाणे लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या अजरामर सुरांना उजाळा; ‘मृदगंध पुरस्कारां’चे 26 नोव्हेंबरला वितरण

लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या अजरामर सुरांना उजाळा; ‘मृदगंध पुरस्कारां’चे 26 नोव्हेंबरला वितरण

0
लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या अजरामर सुरांना उजाळा; ‘मृदगंध पुरस्कारां’चे 26 नोव्हेंबरला वितरण

काही आवाज काळाच्या पडद्याआड जात नाहीत, तर ते पिढ्यान्‌पिढ्या मनामनांत घुमत राहतात. लोकशाहीर विठ्ठल उमप हे असेच एक अजरामर व्यक्तिमत्त्व! आपल्या पहाडी आवाजाने आणि लोककलेवरील निष्ठेने त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला समृद्ध केले. आज ते प्रत्यक्षात आपल्यात नसले, तरी त्यांची गाणी आणि कलेचा वारसा रसिकांच्या स्मरणात जिवंत आहे. लोकसंगीताच्या माध्यमातून समाजाशी नाते जोडणाऱ्या विठ्ठल उमप यांचे योगदान आजही मराठी रसिकांसाठी अमूल्य आहे. लोककला, लोकसंगीत आणि सामाजिक जाणीव यांचा सुरेल संगम आपल्या कलाविष्कारातून घडवणारे लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले.

संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या या ज्येष्ठ शाहिराने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनशैलीतून लोकपरंपरेला समृद्ध केले. याच अजरामर आठवणींना स्वरांमधून अभिवादन करण्यासाठी त्यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त १६ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह आयोजित करण्यात आला आहे. याच सोहळ्यात विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या ‘मृदगंध पुरस्कारां’चे वितरण २६ नोव्हेंबर रोजी गडकरी रंगायतन ठाणे येथे सायंकाळी ६.०० वा. संपन्न होणार आहे. समाजाच्या विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात यंदा कोणाच्या कार्याचा सन्मान होणार, याची उत्सुकता आहे. विठ्ठल उमप यांच्या स्मृती जपत लोककलेचा गौरव करणारा हा सोहळा विशेष ठरणार आहे.

https://www.prahaar.in/2026/11/02/cctv-locked-doors-and-clean-toilets-travel-creator-shares-their-experience/

‘बाबांची आठवण माझ्यासाठी केवळ आठवण नाही, तर ती माझ्या आयुष्याचा आणि कलेचा अविभाज्य भाग आहे. त्यांनी आपल्या आवाजातून लोकांच्या मनात जे स्थान निर्माण केलं, तो वारसा पुढे घेऊन जाणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज ते माझ्यासोबत नसले, तरी त्यांची गाणी, त्यांचे विचार आणि लोककलेवरचं त्यांचं प्रेम मला प्रत्येक पावलावर प्रेरणा देतं. विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहाच्या माध्यमातून बाबांना आदरांजली वाहताना मनात एकच भावना असते त्यांनी जपलेली लोककला अशीच जिवंत राहावी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचावी. ‘मृदगंध पुरस्कारां’च्या माध्यमातून समाजासाठी मनापासून काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करता येतो, ही माझ्यासाठी बाबांच्या कार्याला पुढे नेण्याची एक भावनिक संधी आहे.’ असं नंदेश उमप म्हणाले. २०१२ साली स्थापन झालेलं विठ्ठल उमप फाऊंडेशन आजवर अनेक गरजूंना मदतीचा आधार ठरलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here