मुंबई : बांगलादेशी, रोहिंग्यांसह सर्व ‘घाण’ मुंबई आणि महाराष्ट्रातून साफ करायची असेल, तर हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे मत राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी व्यक्त केले. भाजप महायुतीच्या वतीने आयोजित ‘लोकतंत्र बचाओ… अराजकता हटाओ’ पदयात्रेत ते बोलत होते. सत्ता मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील नेते देशविरोधी प्रवृत्तींशी हातमिळवणी करून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाजप महायुतीच्या वतीने सोमवारी शिवाजी पार्क ते प्रभादेवीदरम्यान या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा यांच्यासह मुंबईतील खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी बोलताना राणे यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला. नजीकच्या काळात सत्ता मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने पुन्हा सत्तेवर येण्यासाठी अराजकतेचा मार्ग स्वीकारण्याची भूमिका विरोधकांनी घेतली आहे. देशविरोधी प्रवृत्तींशी हातमिळवणी करून ते हे प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. इस्लाम राष्ट्र निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असून, अशा प्रवृत्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मान्य नाही. विशिष्ट समुदायाला खूश करण्यासाठी आणि पाकिस्तानमधील त्यांच्या अब्बांना खूश करण्यासाठी विरोधकांकडून राजकीय नाटके केली जात असल्याची टीका राणे यांनी केली.
https://www.prahaar.in/2026/11/02/why-do-those-who-preach-about-a-pollution-free-diwali-stay-silent-during-eid-and-muharram-minister-nitesh-rane-asks/
मुंबई आणि महाराष्ट्रातून अशा घुसखोरांना बाहेर काढायचे असेल, तर हिंदूंनी एकजुटीने आणि ताकदीने एकत्र येण्याची गरज आहे, असे मंत्री राणे म्हणाले. ही पदयात्रा भाजप, शिवसेना किंवा महायुतीच्या कार्यकर्त्यांची नसून, प्रत्येकाने भारतीय म्हणून रस्त्यावर उतरले पाहिजे आणि हिंदू राष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना योग्य संदेश दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.