Home महाराष्ट्र नाशिक Jalgaon : मुंबई-पुण्याहून नागपूरसाठी दोन विशेष सुपरफास्ट रेल्वे; नाशिक, जळगाव, भुसावळच्या प्रवाशांनाही दिलासा

Jalgaon : मुंबई-पुण्याहून नागपूरसाठी दोन विशेष सुपरफास्ट रेल्वे; नाशिक, जळगाव, भुसावळच्या प्रवाशांनाही दिलासा

0
Jalgaon : मुंबई-पुण्याहून नागपूरसाठी दोन विशेष सुपरफास्ट रेल्वे; नाशिक, जळगाव, भुसावळच्या प्रवाशांनाही दिलासा

जळगाव : सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई आणि पुणे येथून नागपूरसाठी दोन विशेष सुपरफास्ट रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)–नागपूर आणि हडपसर–नागपूर या मार्गांवर या गाड्या धावणार आहेत. या अतिरिक्त रेल्वेसेवेमुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून नाशिक रोड, मनमाड, जळगाव आणि भुसावळ स्थानकांवरही या गाड्यांना थांबे देण्यात आले आहेत.

मुंबई–नागपूर आणि पुणे–नागपूर मार्गावर प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नियमित रेल्वेगाड्यांमध्ये आरक्षण मिळवताना प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. अतिरिक्त गाड्या सुरू करण्याची मागणीही अनेक दिवसांपासून होत होती. या मागणीसाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार स्मिता उदय वाघ आणि आमदार चैनसुख संचेती यांनी पाठपुरावा केला होता. याशिवाय मध्य रेल्वेचे झेडआरयूसीसी सदस्य ॲड. महेंद्रकुमार बुरड आणि पश्चिम रेल्वेचे डीआरयूसीसी सदस्य महेंद्र कोठारी यांनी मध्य रेल्वेचे पीसीओएम अरविंद माळखेडे आणि सीपीटीएम डॉ. मिलिंद हिरवे यांची भेट घेऊन विशेष गाड्या सुरू करण्याची मागणी केली होती. या प्रयत्नांनंतर मध्य रेल्वेने दोन विशेष रेल्वेसेवांना मंजुरी दिली आहे.

एलटीटी–नागपूर गाडीच्या आठ फेऱ्या

लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर दरम्यान ०१०८९ आणि ०१०९० क्रमांकाच्या विशेष सुपरफास्ट गाड्या चालविण्यात येणार आहेत. दोन्ही दिशांनी प्रत्येकी चार फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गाडी क्रमांक ०१०८९ दर गुरुवारी आणि रविवारी रात्री ९.४५ वाजता एलटीटी येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१० वाजता नागपूरला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१०९० दर शुक्रवारी आणि सोमवारी दुपारी ४.१० वाजता नागपूरहून रवाना होईल. ती दुसऱ्या दिवशी पहाटे ५.५० वाजता एलटीटी येथे पोहोचणार आहे. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असतील. एलटीटीहून नागपूरकडे जाणारी सेवा ५ ते १५ नोव्हेंबरदरम्यान, तर नागपूरहून एलटीटीकडे येणारी सेवा ६ ते १६ नोव्हेंबरदरम्यान चालविण्यात येणार आहे.

https://www.prahaar.in/2026/11/02/threat-to-blow-up-nashik-district-court-with-a-bomb-police-machinery-on-high-alert/

हडपसर–नागपूर विशेष गाडीच्या चार फेऱ्या

पुणे आणि विदर्भातील प्रवाशांसाठी हडपसर–नागपूर मार्गावर ०१४४३ आणि ०१४४४ क्रमांकाच्या साप्ताहिक विशेष गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. या सेवांच्या दोन्ही दिशांनी प्रत्येकी दोन फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०१४४३ दर शनिवारी सायंकाळी ४.०५ वाजता हडपसर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१४४४ दर रविवारी सायंकाळी ७.४० वाजता नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.०५ वाजता हडपसरला पोहोचणार आहे. या गाडीला उरुळी, दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे देण्यात आले आहेत. हडपसरहून नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या ७ आणि १४ नोव्हेंबर रोजी धावतील. तर नागपूरहून हडपसरकडे येणाऱ्या गाड्या ८ आणि १५ नोव्हेंबर रोजी धावणार आहेत.

विशेष गाड्यांपाठोपाठ कायमस्वरूपी सेवेची मागणी

मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे सध्या प्रवाशांना अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार असला, तरी मुंबई–नागपूर आणि पुणे–नागपूर मार्गावर नियमित अतिरिक्त रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी कायम आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहता नियमित गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करणे आणि उपलब्ध गाड्यांना अतिरिक्त डबे जोडणे आवश्यक असल्याचे मत प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.विशेषतः नाशिक रोड, मनमाड, जळगाव आणि भुसावळ या स्थानकांवरील प्रवाशांसाठी नव्या गाड्या उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे या विशेष रेल्वेसेवांना प्रवाशांकडून कसा प्रतिसाद मिळतो आणि भविष्यात या मार्गांवर कायमस्वरूपी अतिरिक्त गाड्या सुरू होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here