Home ब्रेकिंग न्यूज Maharashtra Weather : नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, थंडीची प्रतीक्षा कायम

Maharashtra Weather : नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, थंडीची प्रतीक्षा कायम

0
Maharashtra Weather : नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, थंडीची प्रतीक्षा कायम
नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, थंडीची प्रतीक्षा कायम (Photo ANI)

Maharashtra Weather: राज्यातील हवामानात पुन्हा बदल झाला असून, नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी अपेक्षित थंडी अद्याप जाणवत नाही. काही भागांत उष्ण आणि कोरडे हवामान आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ प्रणालीचा परिणाम राज्यातील हवामानावर होत असल्याने कोकणापासून विदर्भापर्यंत काही भागांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

https://www.prahaar.in/2026/11/01/marathwada-buisnessman-provide-a-relief-fund-of-6-crore-rupees-for-drought-affected-farmers-cheques-handed-over-to-the-cm-devendra-fadanvis/

उत्तर महाराष्ट्रात कुठे पावसाची शक्यता?

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि घाटमाथ्याच्या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींसह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. पुढील 3 ते 4 दिवस बहुतांश भागांत कोरडे वातावरण राहू शकते. काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता असून, तापमानात किंचित घट होऊ शकते.

पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्याला यलो अलर्ट

पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज

मराठवाड्यातील बहुतांश भागांत हवामान कोरडे आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे.

विदर्भात 3 नोव्हेंबरला यलो अलर्ट

विदर्भात 2 नोव्हेंबर रोजी बहुतांश जिल्ह्यांत हवामान कोरडे, उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. काही भागांत ढगाळ वातावरणही पाहायला मिळू शकते. मात्र, 3 नोव्हेंबर रोजी विदर्भातील बहुतांश भागांसाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या भागांत पावसाची शक्यता वाढली आहे.

एकूणच, नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच राज्यात संमिश्र हवामान अनुभवायला मिळत आहे. काही भागांत पावसाच्या सरी, तर काही ठिकाणी उष्ण आणि कोरडे वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना अद्याप थंडीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here