Home महाराष्ट्र ठाणे ठाणे शहर भाजपच्यावतीने आयोजित ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ आंदोलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेस-इंडिया आघाडीवर घणाघात

ठाणे शहर भाजपच्यावतीने आयोजित ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ आंदोलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेस-इंडिया आघाडीवर घणाघात

0
ठाणे शहर भाजपच्यावतीने आयोजित ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ आंदोलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेस-इंडिया आघाडीवर घणाघात

ठाणे : ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’च्या नावाखाली काँग्रेस, इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जाणीवपूर्वक फेक नॅरेटिव्ह पसरवले जात असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. देशात लोकशाही धोक्यात असल्याचा विरोधकांचा दावा म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली. १९७५ मधील आणीबाणीची आठवण करून देत त्या काळात विरोधी नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते आणि माध्यमांवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, आज विरोधकांना आंदोलन, मोर्चे आणि निदर्शने करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असूनही ते लोकशाही धोक्यात असल्याचा कांगावा करत असल्याचे शिंदे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि अन्य घटनात्मक संस्थांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून काँग्रेस जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. न्यायव्यवस्थेवर दबाव आणणे आणि न्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी करणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा अपमान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या पदयात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, डॉ. हेमंत सावरा, माजी खासदार कपिल पाटील, संजीव नाईक, आनंद परांजपे यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे अनेक मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://www.prahaar.in/2026/11/01/two-brothers-an-unbreakable-bond-emotional-trailer-for-bandhu-released-release-date-also-set/

राहुल गांधी यांनी केलेल्या ‘व्होट चोरी’च्या आरोपांनाही शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. आरोप करण्याऐवजी ठोस पुरावे सादर करण्याचे आव्हान त्यांनी दिले. तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सरकारे स्थापन झाली, तीदेखील व्होट चोरी करूनच आली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आलेल्या खासदारांनी राजीनामा देऊन व्होट चोरीचे आरोप सिद्ध करावेत, असे खुले आव्हानही त्यांनी दिले. २०१९ मध्ये जनतेने शिवसेना-भाजप युतीला दिलेला कौल काँग्रेससोबत सत्ता स्थापन करून बदलण्यात आला. त्यामुळे खरी व्होट चोरी तेव्हाच झाली, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे गटाला लगावला. कोविड काळात मुंबई महापालिकेत आर्थिक गैरव्यवहार करणारेच आज व्होट चोरीच्या गोष्टी करत असल्याची टीकाही शिंदे यांनी केली.

२०१४ पूर्वीचा भारत आणि आजचा ‘नया भारत’ यातील बदल अधोरेखित करताना शिंदे यांनी पाकिस्तानविरोधातील कारवाई, ऑपरेशन सिंदूर, दहशतवादाविरोधातील कठोर भूमिका, नक्षलवादावरील कारवाई, अयोध्येतील राम मंदिर आणि जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयांचा उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली असती, असेही ते म्हणाले. मोदी सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करत शिंदे यांनी कोट्यवधी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आल्याचा दावा केला. ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य, जनधन योजना, लखपती दीदी, पीएम-किसान, बेटी बचाओ, स्टार्टअप इंडिया आणि कौशल्य विकास यांसारख्या योजनांमुळे सर्वसामान्यांना मोठा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक बँकेच्या अहवालाचा संदर्भ देत देशातील गरिबीचे प्रमाण २७.१ टक्क्यांवरून २.६ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान मोदी यांना ३६ देशांनी सर्वोच्च नागरी सन्मान दिल्याचे सांगत, वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून कर्तव्याला प्राधान्य देणारे ते कर्मयोगी पंतप्रधान असल्याचे शिंदे म्हणाले.

https://www.prahaar.in/2026/11/01/mumbai-municipal-corporation-to-install-new-fire-safety-system-across-seven-buildings-at-nair-hospital-amid-safety-concerns/

कॅप्टन स्मिथ यांनी पंतप्रधान मोदी यांना प्रेरणास्थान म्हटल्याचा संदर्भ देत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तरुणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करण्याऐवजी त्यांना रोजगार, कौशल्य विकास आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. “मोदी हटावचा नॅरेटिव्ह आता चालणार नाही. विरोधकांच्या फेक नॅरेटिव्ह आणि गोबेल्स नीतीला जशास तसे उत्तर द्या. महाराष्ट्रात महायुतीचा आणि देशात एनडीएचा भगवा कायम फडकत राहील,” असा विश्वास व्यक्त करत शिंदे यांनी आगामी काळातही विकासाचा वेग कायम ठेवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here