त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर मंत्रोच्चार, शंखनाद आणि साधू महंतांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शृंगेरीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजारोहण सोहळ्याच्या प्रारंभी पवित्र गोदावरीचे विधिवत पूजन करण्यात आले.
मंत्रोच्चारांतून गोदावरीचे स्तवन केल्यानंतर संकल्पविधी करण्यात आला. गणेशपूजनाने पूजाविधीचा प्रारंभ झाला.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे सर्व धार्मिक विधी आणि आयोजन निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी श्रीगणेशाला आवाहन करण्यात आले.
गोदावरी गंगा प्रार्थना आणि सामूहिक प्रार्थनेने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर धर्मध्वज आणि ध्वजपताकेचे विधिवत पूजन झाले.
धर्मध्वज पूजनानंतर शंखनाद करून ध्वजाची आरती करण्यात आली. त्यानंतर जगद्गुरू शंकराचार्य आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी धर्मध्वजाची प्रदक्षिणा केली.
मंत्रोच्चारांत, शंखनाद आणि धार्मिक जयघोषात धर्मध्वजारोहणाचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
धर्मध्वजारोहणानंतर पवित्र गोदावरीची आरती करण्यात आली.
धर्मध्वजारोहणानंतर सिंहस्थ पर्वाचा प्रारंभ होतो. धर्मध्वज पौराणिक परंपरेचे, गोदावरीच्या पावित्र्याचे आणि धार्मिक श्रद्धेचे प्रतीक मानला जातो.