नाशिक (सुहास शेलार) : गोदावरीच्या तीरावर वेदमंत्रांचे स्वर, रामतीर्थावर उभारलेले भव्य व्यासपीठ, विद्युत रोषणाईने उजळलेली मंदिरे आणि धर्मध्वजारोहणाच्या सोहळ्यासाठी सज्ज झालेला गोदाकाठ… अशा मंगलमय वातावरणात नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वाचा शंखनाद होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या महाध्वज प्रतिष्ठापना सोहळ्याचा मुख्य क्षण शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रामतीर्थावर होणाऱ्या धर्मध्वजारोहणाने अनुभवता येणार आहे. दुपारी १२ वाजून २ मिनिटांचा मुहूर्त या ऐतिहासिक सोहळ्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील साधू-संत, आखाड्यांचे प्रतिनिधी, मान्यवर आणि भाविक नाशिकमध्ये दाखल होत आहेत. धर्मध्वजारोहणानंतर राष्ट्रपती कुशावर्त तीर्थ आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला भेट देणार असून, सायंकाळी रामतीर्थावर होणाऱ्या गोदा महाआरतीत सहभागी होणार आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक परंपरेतील महत्त्वाचा मानला जाणारा महाध्वज प्रतिष्ठापना सोहळा शुक्रवारी विविध विधींनी सुरू झाला. ध्वजदंड प्रतिष्ठापना आणि नगरप्रदक्षिणेने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. वेदमूर्ती भालचंद्र एकनाथशास्त्री शौचे गुरुजी आणि यज्ञाचार्य पंडित वैभव दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी पार पडले. तीर्थपूजन, संकल्प, गणेशपूजन, नवग्रह रुद्र स्थापना, स्नपन विधान, विविध हवन, धान्याधिवास आणि शय्याधिवास असे विधी पहिल्या दिवशी संपन्न झाले. सायंकाळी गोदावरीची विशेष प्रार्थना आणि महाआरती करण्यात आली.
धर्मध्वजाची नगरप्रदक्षिणा या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरली. काळाराम मंदिरातून मुख्य ध्वज आणून तपोवन, गणेशवाडी, मेनरोड आणि चांदीचा गणपती मंदिर या मार्गाने रामतीर्थापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. धर्मध्वजाच्या साक्षीने नाशिकच्या धार्मिक परंपरेचा जागर करत ही मिरवणूक गोदावरीच्या तीरावर पोहोचली. याच पार्श्वभूमीवर तपोवन येथील मोदी मैदानातून ‘धर्म ध्वज ग्राम परिक्रमा’ काढण्यात आली. ‘धर्माच्या ध्वजाखाली एक होऊया’ हा संदेश देणाऱ्या या परिक्रमेत भाविक, धर्मप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. पंचमुखी हनुमान मंदिर, गणेशवाडी, गाडगे महाराज चौक, नेहरू चौक, धुमाळ पॉइंट, मेनरोड, रविवार कारंजा आणि मालेगाव स्टँड या मार्गाने परिक्रमा रामकुंडावर पोहोचली. तेथे लक्षदीप महाआरतीने परिक्रमाची सांगता झाली. श्री गंगा गोदावरी पंचकोशी पुरोहित संघ आणि सिंहस्थ समितीच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध धार्मिक संस्था, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संप्रदाय, कुंभमेळा प्राधिकरण, महापालिका, पोलीस आणि विश्व हिंदू परिषद यांचे सहकार्य या उपक्रमाला लाभले.
शनिवार हा तीन दिवसीय सोहळ्यातील मुख्य दिवस असेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सकाळी ११.३० वाजता रामतीर्थ येथे आगमन होणार असून, त्यांच्यासमवेत ध्वजपूजन आणि अन्य कार्यक्रम होतील. त्यानंतर दुपारी १२.०२ वाजता राष्ट्रपतींच्या हस्ते सिंहस्थ महाकुंभमेळ्याचे मुख्य धर्मध्वजारोहण आणि ध्वजस्तंभ प्रतिष्ठापना सोहळा पार पडेल. या कार्यक्रमानंतर दुपारी २.१५ वाजता राष्ट्रपती कुशावर्त तीर्थाच्या दिशेने प्रयाण करतील. २.४५ वाजता कुशावर्त तीर्थ येथे आगमन झाल्यानंतर तेथे त्यांचा कार्यक्रम असेल. त्यानंतर दुपारी ३.२५ वाजता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराकडे प्रयाण करून ३.३० वाजता मंदिरात आगमन होईल. येथे राष्ट्रपती दर्शन घेणार आहेत. त्यानंतर, सायंकाळी ५.२० वाजता रामतीर्थ येथे आगमन झाल्यानंतर ५.३० वाजता सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमास त्या उपस्थित राहतील. सायंकाळी ६.३० वाजता गोदा महाआरतीला उपस्थिती लावल्यानंतर राष्ट्रपतींच्या दौऱ्यातील प्रमुख कार्यक्रमांची सांगता होईल.
या सोहळ्यासाठी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, शृंगेरी मठाचे शंकराचार्य जगद्गुरू श्री श्री विधुशेखर भारती स्वामी, आखाड्यांचे प्रमुख, साधू-महंत आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील १ हजार ३१७ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्यातील २९ मंत्री, विधानसभेचे २८८ आणि विधान परिषदेचे ७८ सदस्य, ४८ खासदार, नाशिकचे १२२ नगरसेवक, १७ नगराध्यक्ष, १२५ अधिकारी, पुरोहित संघाचे २०० पदाधिकारी आणि साधू-महंतांचे ३०० प्रतिनिधी यांचा समावेश आहे. मोठ्या संख्येने मान्यवर आणि भाविक उपस्थित राहणार असल्याने रामतीर्थ आणि गोदावरी घाट परिसरात गर्दीचे नियोजन, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देण्यात आले आहे.
रामतीर्थ आणि गोदावरी घाटाला नवी झळाळी
- रामतीर्थ आणि गोदावरी घाट परिसरानेही या सोहळ्यासाठी नवे रूप धारण केले आहे. घाटांवर विद्युत रोषणाई, मंदिरांची रंगरंगोटी आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. डीएमएक्स पिक्सेल आणि थ्रीडी मॅपिंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घाट, मंदिरे आणि परिसरातील वास्तूंवर आकर्षक प्रकाशयोजना साकारण्यात आली आहे. प्रत्येक दिव्याचा रंग, प्रकाशाची तीव्रता आणि दिवे सुरू-बंद होण्याचा वेग संगणकाद्वारे स्वतंत्रपणे नियंत्रित करता येणार आहे.
- धार्मिक परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालणारी ही प्रकाशयोजना सोहळ्याचे वेगळेपण ठरणार आहे. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता यावे यासाठी रामकुंड, गाडगे महाराज पूल आणि कपालेश्वर मंदिर परिसरात एलईडी स्क्रीन उभारण्यात येत आहेत. या कामांच्या माध्यमातून १ हजार २०० हून अधिक स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
गर्दी व्यवस्थापनाची कसोटी
सोहळ्याच्या भव्यतेबरोबरच गर्दीचे व्यवस्थापन हे प्रशासनासमोरील महत्त्वाचे आव्हान आहे. रामकुंड परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रविवार कारंजा ते अहिल्याबाई होळकर पूल, मालेगाव स्टँड आणि मुख्य बाजारपेठेतून रामकुंडाकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्याचे नियोजन आहे. मखमलाबाद नाक्याकडून पंचवटी आणि कपालेश्वर मंदिराच्या दिशेने येणारा मार्ग, तसेच गाडगे महाराज पूल आणि रामसेतू पुलावरून रामकुंडाकडे जाणारी वाहतूकही बंद ठेवण्यात येणार आहे. भद्रकाली आणि मेनरोडकडून रामकुंडाकडे जाणाऱ्या अंतर्गत गल्ल्या आणि जोडरस्त्यांवरही निर्बंध असतील. गर्दीचे नियंत्रण, सुरक्षाव्यवस्था आणि आपत्कालीन सेवांसाठी मार्ग मोकळे ठेवण्याच्या दृष्टीने हे बदल करण्यात आले आहेत.
गोदावरी घाटावरील दुकाने ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षेच्या कारणास्तव पंचवटी व परिसरातील ७१ शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. राष्ट्रपतींसह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्ह्यात ड्रोन उड्डाण आणि पॅराग्लायडिंगवर निर्बंध घालण्यात आले आहेत. विनापरवानगी ड्रोन उड्डाण केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.