हॉंगकॉंग : हॉंगकॉंग इंटरनॅशनल सिक्सेस स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ‘क’ गटातील सामना चांगलाच रंगला. मात्र, भारताने दिलेले 89 धावांचे लक्ष्य पाकिस्तानने अवघ्या 3.5 षटकांत पूर्ण करत 4 विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. शशांक सिंगच्या आक्रमक खेळीने भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 6 षटकांत 5 गडी गमावून 88 धावा केल्या. शशांक सिंगने अवघ्या 11 चेंडूंत 40 धावांची तडाखेबंद खेळी करत संघाच्या धावसंख्येला वेग दिला. मात्र, सलामीवीर राहुल त्रिपाठी (9) आणि नितीश राणा (19) यांना मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार कृणाल पांड्या आणि राहुल तेवतिया यांनाही अपेक्षित योगदान देता आले नाही.
ख्वाजा नफे आणि अब्बास आफ्रिदीची वादळी फलंदाजी
89 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर ख्वाजा नफेने 12 चेंडूंत 41 धावा, तर अब्बास आफ्रिदीने अवघ्या 8 चेंडूंत 35 धावा ठोकल्या. या दोघांनी केवळ 13 चेंडूंत 59 धावांची भागीदारी करत पाकिस्तानच्या विजयाचा पाया रचला. विशेष म्हणजे, टी. नटराजनच्या पहिल्याच षटकात पाकिस्तानने 28 धावा वसूल केल्या. त्यानंतर अब्दुल समद आणि इरफान खान यांनी उर्वरित धावा पूर्ण करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. पाकिस्तानने 3.5 षटकांत 2 गडी गमावून 91 धावा केल्या.
https://www.prahaar.in/2026/10/30/ind-vs-nz-prasidh-krishna-moved-from-the-odi-squad-directly-to-india-a-find-out-what-has-been-decided-regarding-mohammed-siraj/
भारतासाठी पुढील सामना महत्त्वाचा
स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात UAE कडून 1 विकेटने पराभूत झालेल्या पाकिस्तानने भारताविरुद्धच्या विजयामुळे ‘क’ गटात अव्वल स्थान गाठले. दुसरीकडे, भारताला या पराभवामुळे गटातील आपले स्थान सुधारण्यासाठी पुढील सामन्यात विजय मिळवणे महत्त्वाचे ठरणार आहे. भारताचा या स्पर्धेतील दुसरा आणि अखेरचा गट सामना शनिवारी, 31 ऑक्टोबर रोजी UAE विरुद्ध होणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार असून, स्पर्धेचा अंतिम सामना रविवार, 1 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे.