मुंबई: आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आणि WhatsApp चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगार नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात ओढत आहेत. WhatsApp वर घरबसल्या पैसे कमावण्याची संधी, पार्ट टाइम जॉब किंवा ऑनलाइन टास्कच्या नावाखाली आकर्षक मेसेज पाठवले जात आहेत. सुरुवातीला छोट्या कामांच्या बदल्यात पैसे देऊन विश्वास संपादन केला जातो आणि त्यानंतर मोठ्या कमाईचे आमिष दाखवून पैशांची मागणी केली जाते. अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन गृह मंत्रालय आणि सायबर यंत्रणांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे WhatsApp वर येणाऱ्या अनोळखी मेसेजवर विश्वास ठेवण्यापूर्वी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
नेमकी फसवणूक कशी होते?
1.अनोळखी नंबरवरून WhatsApp वर मेसेज येतो. घरबसल्या पैसे कमावण्याची संधी असल्याचं सांगितलं जातं.
2.YouTube व्हिडीओला लाईक करणे, हॉटेलला रेटिंग देणे किंवा ऑनलाइन रिव्ह्यू लिहिणे अशी छोटी कामं दिली जातात.
3.सुरुवातीला काही पैसे देऊन विश्वास संपादन केले जाते.
4.त्यानंतर जास्त कमाईसाठी पैसे गुंतवण्यास सांगितले जाते.
5.पैसे जमा केल्यानंतर अधिक रक्कम मागितली जाते किंवा पैसे काढता येत नाहीत.
“व्हॉट्सॲपचा वापर करून तुम्ही मोठी कमाई कशी करू शकता?” सोशल मीडियासह विविध ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारच्या जाहिराती कदाचित पाहायला मिळत असतील. भारतात व्हॉट्सॲप फ्रॉड आणि सायबर गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.ज्यामध्ये दरमहा सरासरी ९० लाख ते १ कोटी भारतीय व्हॉट्सॲप खाती संशयास्पद हालचालींमुळे बॅन केली जात आहेत. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ‘अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या कमाईच्या ऑफरची पडताळणी करावी.
अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करू नयेत. पैसे पाठवण्यापूर्वी UPI वर दिसणाऱ्या प्राप्तकर्त्याच्या नावाची तपासणी करावी. संशयास्पद आर्थिक व्यवहारांपासून दूर राहावे.’ (WHATSAPP SCAM)
https://www.prahaar.in/2026/10/30/dadar-railway-station-once-again-gripped-by-hawkers/
WhatsApp अकाउंट भाड्याने घेण्याचा नवा प्रकार
राष्ट्रीय सायबर क्राईम यंत्रणेने WhatsApp Web Account Renting Scam बाबतही सावध केले आहे.
यामध्ये नागरिकांना WhatsApp अकाउंट लिंक केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवले जाते. त्यासाठी QR कोड स्कॅन करण्यास सांगितले जाते.
मात्र, असे केल्याने अनोळखी व्यक्तीला तुमच्या WhatsApp अकाउंटचा ॲक्सेस मिळू शकतो. त्यानंतर तुमच्या अकाउंटचा वापर इतर लोकांची फसवणूक करण्यासाठी केला जाऊ शकतो.(YOUTUBE LIKE AND SUBSCRIBE TASK)
व्हॉट्सॲप फसवणुक झाली तर कशी काळजी घ्यावी?
1.अनोळखी व्यक्तीला पैसे पाठवू नका.
2.कोणालाही OTP किंवा बँक खात्याची माहिती देऊ नका.
3.अनोळखी लिंक किंवा ॲप डाउनलोड करू नका.
4.WhatsApp अकाउंट लिंक करण्यासाठी अनोळखी QR कोड स्कॅन करू नका.
https://www.prahaar.in/2026/10/30/nashik-kumbhmela-the-godavari-began-to-flow-briskly-ahead-of-the-simhastha-kumbh-mela-flag-hoisting-ceremony-300-cusecs-of-water-were-released-from-the-gangapur-dam/
फसवणूक झाल्यास काय करावे?
तातडीने 1930 या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइनवर संपर्क साधावा. राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टल वर तक्रार नोंदवावी. जो काही फ्रॉड झाला आहे त्याबद्दल सविस्तर माहिती पोलिसांना द्यावी. संबंधित बँकेलाही त्वरित कळवावे.