Home इन्फोग्राफिक्स Nashik Kumbhmela : पावसाच्या अंदाजामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यात बदल ? हेलिकॉप्टरऐवजी रस्तेमार्गे प्रवासाची तयारी

Nashik Kumbhmela : पावसाच्या अंदाजामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यात बदल ? हेलिकॉप्टरऐवजी रस्तेमार्गे प्रवासाची तयारी

0
Nashik Kumbhmela : पावसाच्या अंदाजामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यात बदल ? हेलिकॉप्टरऐवजी रस्तेमार्गे प्रवासाची तयारी

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक-त्र्यंबकेश्वर दौऱ्याची प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, ३१ ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने दौऱ्याच्या नियोजनात बदल होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींचा नाशिक ते त्र्यंबकेश्वर प्रवास हेलिकॉप्टरऐवजी रस्तेमार्गे करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या संभाव्य बदलामुळे पोलिस प्रशासनाला सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियोजनाचा नव्याने आढावा घ्यावा लागणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाची जय्यत तयारी

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होणार आहे. या महत्त्वपूर्ण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. सुरुवातीच्या नियोजनानुसार, राष्ट्रपतींचे विशेष विमानाने ओझर विमानतळावर आगमन झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मैदानावर हेलिकॉप्टरने जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर वाहनाने रामकुंड येथे आगमन, तेथून हेलिकॉप्टरने त्र्यंबकेश्वरला प्रयाण आणि कार्यक्रमानंतर पुन्हा नाशिकला परतण्याचे नियोजन होते.या दौऱ्यासाठी हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच हेलिपॅडपासून कार्यक्रमस्थळापर्यंतच्या प्रवासाची रंगीत तालीमही पोलिस प्रशासनाकडून घेण्यात आली होती.

हवामानाच्या अंदाजामुळे नियोजनात बदलाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान नाशिकसह राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरच्या उड्डाणात अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन दौऱ्याच्या नियोजनाचा फेरआढावा घेतला जात असल्याचे समजते.नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा प्रवास रस्तेमार्गे करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता कार्यक्रमस्थळावरील व्यवस्था आणि अन्य सुविधांचाही आढावा घेणे प्रशासनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

https://www.prahaar.in/2026/10/27/nashik-kumbhmela-a-season-of-religious-and-cultural-festivities-in-shik-a-grand-cultural-procession-on-october-30th-and-a-religious-flag-hoisting-ceremony-on-october-31st/

राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी पोलिसांना करावे लागणार नव्याने नियोजन

राष्ट्रपतींचा प्रवास रस्तेमार्गे झाल्यास संपूर्ण मार्गावरील सुरक्षा व्यवस्था अधिक व्यापक करावी लागणार आहे. राष्ट्रपतींच्या ताफ्याची सुरक्षित हालचाल सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांना अतिरिक्त नियोजन करावे लागण्याची शक्यता आहे. यामध्ये मार्गावरील बंदोबस्त, बॅरिकेडिंग, वाहतुकीतील बदल, पर्यायी मार्गांची आखणी आणि संवेदनशील ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्थेचा समावेश असेल. याशिवाय ताफा जाणाऱ्या रस्त्यांची पाहणी, आवश्यक डागडुजी आणि संपूर्ण मार्गाची रंगीत तालीम घेण्याची तयारीही करावी लागणार आहे.

वाहतूक नियंत्रणाचे मोठे आव्हान

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रपतींचा प्रवास रस्तेमार्गे झाल्यास वाहतूक सुरळीत ठेवणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक निर्बंध लागू करणे, हे पोलिस प्रशासनासमोरील महत्त्वाचे आव्हान असेल. दरम्यान, हवामानाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याच्या नियोजनात नेमके कोणते बदल करण्यात येणार, याबाबत अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here