मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी, तर आमदार झिशान सिद्दीकी यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बुधवारी, 28 ऑक्टोबर रोजी या नियुक्त्यांची घोषणा केली. ( Maharashtra Politics)
देवगिरी निवासस्थानी नियुक्तीपत्र प्रदान
मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात उमेश पाटील आणि झिशान सिद्दीकी यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ अजित पवार उपस्थित होते. तसेच पक्षाचे अन्य नेते आणि पदाधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पक्ष संघटना बळकट करण्याची जबाबदारी
या नियुक्त्यांमुळे उमेश पाटील यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका मांडण्याची, तर झिशान सिद्दीकी यांच्याकडे मुंबईतील पक्ष संघटनेची जबाबदारी असेल.
लोकनेते अजित पवार यांचे विचार, आदर्श आणि जनसेवेचा वारसा पुढे नेत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी निष्ठेने आणि समर्पणाने काम करावे, अशी अपेक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.