गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या एका शोमधील व्हिडिओज वायरल होत आहेत. कॉफी विथ करण या कार्यक्रमात दोन्ही कलाकारांनी हजेरी लावल्यानंतर त्यांना लक्ष्य करून पसरवल्या जात असलेल्या कथित आणि दिशाभूल करणाऱ्या ऑनलाईन मजकुराची चौकशी करण्याची मागणी करत त्यांच्या मॅनेजरने हैदराबाद येथील सायबर गुन्हे शाखेकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कलाकारांशी संबंधित बनावट मजकूर, फेरफार केलेले स्क्रीनशॉट्स, बनावट ओळख आणि छळवणूक प्रसारित केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या टीमने तपासणीसाठी अधिकाऱ्यांकडे समर्थनार्थ लिंक्स आणि पुरावे सादर केले आहेत. कलाकारांच्या टीमने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ही तक्रार पी. निशांत कुमार यांनी दाखल केली असून दस्तऐवजात त्यांची ओळख दोन्ही कलाकारांचे व्यवस्थापक म्हणून देण्यात आली आहे. टीमने म्हटले आहे की, या कारवाईचा उद्देश अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्याचा नव्हता. त्यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारीमध्ये स्पष्टपणे खोटी माहिती आणि संभाव्य बेकायदेशीर ऑनलाईन वर्तनासाठी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली होती.
https://www.prahaar.in/2026/10/26/yes-im-madly-in-love-with-my-partner-rashmika-mandanas-8-page-slap-at-trollers-vijay-deverakonda-also-criticized-the-trolls/
टीमने सोशल मीडिया वापरकर्त्यांना पडताळणी न केलेले दावे न पसरवण्याचे आवाहन केले असून जिथे आवश्यक असेल तिथे योग्य कायदेशीर उपाययोजना केल्या जातील असेही सांगितले. कथित खोट्या कथा आणि ऑनलाईन छळाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. नुकतेच करण जोहरच्या शोमध्ये रश्मिकाने तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल काही खुलासे केले होते. तिने सांगितले होते की, विजय देवरकोंडाला लग्नासाठी तयार करण्यासाठी तिने त्याला तब्बल एक वर्षभर आणि जवळपास १०० वेळा विचारले होते. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. नेटिझन्सनी दोघांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, विजयला ‘रेड फ्लैग’ म्हटले, तर काहींनी त्यांच्या घटस्फोटाची भविष्यवाणी सुद्धा केली. एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी पुरेसा वेळ घ्यावा अशी विजयची इच्छा असल्याचे त्याने स्पष्ट करून सुद्धा अनेक प्रेक्षकांना त्याच्या वक्त्यव्यामुळे रश्मिकाच्या भावना एकतर्फी वाटल्या. त्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी त्याला ‘धोक्याची सूचना’ म्हटले आणि काहींनी तर त्याच्यावर पत्नीचा अनादर केल्याचा आरोपही केला.
२६ ऑक्टोबर रोजी या जोडप्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे टीकेला उत्तर दिले. रश्मिकाने म्हटले की, ‘मी १००० वेळा देखील विजयला लग्नासाठी विचारले असते. मला जेव्हा सल्ला, सुरक्षा आणि मानसिक आधाराची गरज असते, तेव्हा तोच माझ्या पाठीशी उभा असतो. मी नेहमी त्यालाच निवडेन.होय, मी माझ्या जोडीदाराच्या प्रेमात पूर्णपणे वेडी आहे.’ तर विजयने त्यांचे लग्नानंतरचे आयुष्य अत्यंत आनंदी असून त्याचे रश्मिकावर खूप प्रेम असल्याचे पोस्टद्वारे सांगितले आणि टीकाकारांना आपली मते स्वतःपुरतीच मर्यादित ठेवण्याचे आवाहन केले.