Home नाशिक कुंभमेळा Nashik : सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या मार्गांत बदल, 30 व 31 ऑक्टोबरला वाहतूक निर्बंध लागू

Nashik : सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या मार्गांत बदल, 30 व 31 ऑक्टोबरला वाहतूक निर्बंध लागू

0
Nashik : सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या मार्गांत बदल, 30 व 31 ऑक्टोबरला वाहतूक निर्बंध लागू

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड आणि नवीन घाट येथे ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी महामहिम राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक, भाविक आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या तसेच त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

३० ऑक्टोबर सकाळपासून वाहतूक मार्गात बदल

मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ११५ अन्वये ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपासून ते ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल लागू राहणार आहेत.

नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग

नाशिक-पिंपळगाव बहुला-संदीप फाउंडेशन-खंबाळे-पेगलवाडी फाटा-त्र्यंबकेश्वर या नियमित मार्गाऐवजी वाहनचालकांनी पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा.

पर्यायी मार्ग : अमृत चौक – बारदान फाटा – गोवर्धन – गिरणारे – धोंडेगाव – देवरगाव – वाघेरा फाटा – अंबोली फाटा – सापगाव – त्र्यंबकेश्वर.

त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे येण्यासाठी पर्यायी मार्ग

त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे येणाऱ्या वाहनांसाठी जव्हार-मोखाडा-अंबोली-त्र्यंबकेश्वर-पेगलवाडी-खंबाळे-संदीप फाउंडेशन-नाशिक या मार्गाऐवजी पुढील मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग : जव्हार – मोखाडा – अंबोली टी पॉइंट – वाघेरा फाटा – कोने – साप्ते – देवरगाव – गिरणारे – गोवर्धन – नाशिक.

https://www.prahaar.in/2026/10/26/nashik-no-entry-for-vehicles-towards-ramkund-major-traffic-changes-for-pre-simhastha-religious-ceremonies/

मुंबईकडून येणाऱ्या वाहनांसाठी मार्गात बदल

मुंबईच्या बाजूकडून वैतरणा फाटा-पहिने-त्र्यंबकेश्वर या मार्गाने येणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

पर्यायी मार्ग : वैतरणा फाटा – नाशिक – अमृत गार्डन – बारदान फाटा – गोवर्धन – गिरणारे – धोंडेगाव – त्र्यंबकेश्वर.

पहिने-पेगलवाडी मार्गावरील वाहतुकीसाठीही पर्यायी व्यवस्था

पहिने-पेगलवाडी-नाशिक या मार्गावरील वाहतुकीसाठी पुढील पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग : पहिने – आहुर्ली – सांजेगाव – वाडीवऱ्हे – नाशिक.

तर पहिने-पेगलवाडी-त्र्यंबकेश्वर या मार्गावरील वाहतुकीसाठी पुढील मार्गाचा वापर करावा.

पर्यायी मार्ग : पहिने – भिलमाळ – निरगुडपाडा – जांभुळपाडा – सापगाव – त्र्यंबकेश्वर.

दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देश

वाहतूक बदलाच्या कालावधीत वाहनचालकांना पर्यायी मार्गांची माहिती मिळावी, यासाठी संबंधित मार्गांवर आवश्यक दिशादर्शक फलक आणि वाहतूक चिन्हे लावण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन आधीच करावे, पर्यायी मार्गांचा अवलंब करावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here