Crime News: कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. अवघ्या 19 वर्षीय पुतण्याने चुलत्याच्या घरातून 15 तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. या दागिन्यांची विक्री करून मिळालेल्या पैशांतून त्याने तब्बल 10 लाख रुपयांची महिंद्रा थार कार खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, नवीन कारच्या पूजेसाठी त्याने ज्या चुलत्याच्या घरातून दागिने चोरी केल्याचा आरोप आहे, त्यांनाच कुटुंबासह आमंत्रित केले. या प्रकरणी कोडोली पोलिसांनी तरुणासह चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनाराला ताब्यात घेतले आहे.
https://www.prahaar.in/2026/10/23/five-year-contract-extension-granted-to-kem-hospital-pharmacy-without-a-fresh-tender-process/
महिनाभरापूर्वी दागिन्यांची चोरी
मिळालेल्या माहितीनुसार, समर पोपट चव्हाण हा सातवे येथे कुटुंबासह राहतो. त्याचे चुलते उमेश मारुती चव्हाण यांचे घर जवळच आहे. सुमारे महिनाभरापूर्वी समरने चुलत्याच्या घरातून 15 तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. त्यानंतर हे दागिने गावातील सोनार संग्राम बाबासो मोरे याला 10 लाख रुपयांना विकल्याची माहिती समोर आली आहे.
या पैशांतून समरने महिंद्रा थार कार खरेदी केली. नवीन कार घरी आणल्यानंतर त्याने पूजेसाठी चुलते उमेश चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आमंत्रित केले.
दागिने शोधताना चोरीचा प्रकार उघड
कारच्या पूजेसाठी तयार होत असताना उमेश चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दागिने शोधले. मात्र, दागिने ठेवलेल्या ठिकाणी ते आढळले नाहीत. विशेष म्हणजे, घरातील आजीचे दागिने जागेवर होते; मात्र उमेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नीचे दागिने गायब होते. त्यामुळे चोरी घरातील किंवा जवळच्या व्यक्तीने केली असावी, असा संशय त्यांना आला.
यानंतर उमेश चव्हाण यांनी कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला. समरने अचानक महागडी कार कशी खरेदी केली, याची चौकशी केल्यानंतर चोरीच्या प्रकरणात त्याचा सहभाग उघड झाल्याची माहिती आहे.
पुतण्या आणि सोनार पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणी पोलिसांनी समर चव्हाण आणि चोरीचे दागिने खरेदी केल्याचा आरोप असलेल्या संग्राम मोरे यांना ताब्यात घेतले आहे. चोरीचे दागिने आणि इतर मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास कोडोली पोलीस करत आहेत. पोलीस उपअधीक्षक श्रीकांत ठिकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याचे वृत्त आहे.