Nashik : विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर नाशिककरांनी गृहखरेदीचा मुहूर्त साधत रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा बूस्ट दिला. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरात १०० हून अधिक नवीन बुकिंग, ५५ हून अधिक गृहप्रवेश आणि १२५ कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी दिली. दिवसभरात सुमारे ३०० ते ३५० फ्लॅटची विक्री झाल्याचा अंदाज असून, ग्राहकांच्या प्रतिसादामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेतही मोठी गर्दी झाली. दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, पूजासाहित्य आणि फुलांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. विजयादशमीच्या पूर्वसंध्येपासूनच कपडाबाजार व फूलबाजारात ग्राहकांची लगबग सुरू होती. व्यावसायिकांनी दिलेल्या आकर्षक ऑफर्समुळे सकाळपासूनच दुकानांमध्ये गर्दी झाली. सहकुटुंब खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण होते. त्यामुळे दसऱ्यानिमित्त कोट्यवधींची उलाढाल होऊन व्यापारी वर्गही सुखावला.दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रिअल इस्टेट क्षेत्रात विशेष उत्साह दिसून आला. अनेकांनी नूतन घरात गृहप्रवेश केला, तर काहींनी फ्लॅट आणि रो-हाउसची बुकिंग केली. गेल्या काही दिवसांपासून नवीन घरांबाबत ग्राहकांकडून विचारणा सुरू होती. दसऱ्याच्या मुहूर्तावर त्याचे बुकिंगमध्ये रूपांतर झाल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये ‘फिल गुड’ वातावरण निर्माण झाले आहे.
https://www.prahaar.in/2026/10/21/nashik-crimefake-signature-of-the-district-collector-used-in-nashik-bogus-certificate-submitted-for-petrol-pump-approval-case-registered/
ग्राहकांनी ३५ लाख रुपयांपर्यंतच्या टू बीएचके आणि २५ लाख रुपयांपर्यंतच्या वन बीएचके फ्लॅटला पसंती दिली. नाशिक शहरात दरवर्षी नाशिककरांसह धुळे, जळगाव आणि नंदुरबार भागातील नागरिकही गुंतवणुकीसाठी घरखरेदीला पसंती देतात. यंदा मात्र दुष्काळाच्या सावटाचा काही प्रमाणात गृहखरेदीवर परिणाम जाणवल्याचे सांगितले. – सुनील गवादेअध्यक्ष नरडेको
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि आजच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरात १०० पेक्षा जास्त नवीन बुकिंग, ५५ पेक्षा जास्त गृहप्रवेश आणि १२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल झाली आहे. ग्राहकांचा हा उदंड प्रतिसाद नाशिकच्या गृहनिर्माण क्षेत्रावरील दृढ विश्वास आणि शहराचा वाढता विकास दर्शवतो.” – गौरव ठक्कर, अध्यक्ष, क्रेडाई नाशिक मेट्रो
गृहखरेदीला पसंती
३०० ते ३५० – फ्लॅटची अंदाजे विक्री
१००+ – नवीन बुकिंग
५५+ – गृहप्रवेश
₹१२५ कोटी+ – रिअल इस्टेट उलाढाल
टू बीएचके : ३५ लाख रुपयांपर्यंतच्या घरांना पसंती
वन बीएचके : २५ लाख रुपयांपर्यंतच्या घरांना मागणी
गुंतवणूकदार : नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबारमधून प्रतिसाद