मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि नागरिकांसह पर्यटकांना समुद्राचे विलोभनीय दृश्य पाहता यावे, अनुभवता यावे यासाठी मुंबईतील पहिली व्ह्युईंग गॅलरी बनवल्यानंतर गिरगाव चौपाटीवर दुसरी गॅलरी बनवण्यात आली. त्यानंतर आता समुद्र किनारी हाजीअली येथे तिसरी व्ह्युईंग गॅलरी बनवण्यात येणार आहे. या गॅलरीचे वैशिष्ट्य म्हणजे खालील बाजुस सार्वजनिक शौचालय आणि वरील बाजुस व्ह्युईंग डेक असेल. त्यामुळे मुंबईतील समुद्र चौपाटीवर आता तिसरी व्ह्युईंग गॅलरी बनवण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने सन २०२०मध्ये दादर चैत्यभूमी येथील व्ह्युईंग गॅलरीची संकल्पना मांडण्यात आली आणि सन २०२१मध्ये याच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करून एक वर्षांत ही गॅलरी लोकांसाठी खुली करण्यात आली. समुद्रात २६ खांबांवर ही गॅलरी उभारण्यात आली होती. भरतीच्या लाटांचा विचार करून १० ते १६ फुट उंचीवर याचे बांधकाम करण्यात आले. २४ मीटर लांब अणि २०मीटर रुंद अशाप्रकारे या गॅलरीचे बांधकाम करण्यात आले. आज याठिकाणी एकाच वेळी ३०० पर्यटक उभे राहून समुद्रासह वांद्रे वरळी सी लिंकचा आनंद घेवू शकतात.
https://www.prahaar.in/2026/10/21/three-state-of-the-art-toilets-to-be-built-on-the-western-express-highway-in-mumbai/
या व्ह्युईंग गॅलरीनंतर ऑगस्ट २०२१मध्ये गिरगाव चौपाटीवरील नाना नानी पार्क येथील पावसाळी पाण्याच्या आऊटफॉलवर गॅलरी उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली. त्यानंतर दोनच महिन्यांमध्ये याचे काम ऑक्टोबर २०२१मध्ये हाती घेवून १७ एप्रिल २०२२मध्ये याचे लोकार्पण करण्यात आले.या गॅलरीचे बांधकाम करताना सीआरझेड परवानगी नसल्याचे आरोप करत यावर आक्षेप नोंदवला होता. परंतु त्यानंतरही याचे बांधकाम सात महिन्यांमध्ये पूर्ण करून अखेर १७एप्रिल २०२२मध्ये याचे लोकार्पण करण्यात आले.
समुद्र किनारी पर्यटकांसाठी बनवलेल्या या दोन व्ह्युईंग गॅलरीनंतर आता चार वर्षांनी आता हाजीअली येथे अशाप्रकारची गॅलरी बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. केवळ गॅलरीच नाही तर पर्यटकांसाठी सार्वजनिक शौचालयाचीही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. हाजीअली येथे मोठ्याप्रमाणात पर्यटक येत असल्याने त्यांच्यासाठी शौचालयाचे बांधकाम करताना त्यावर व्ह्युईंग डेक बनवला जाणार आहे. त्यामुळे खालील बाजुस शौचालय आणि वरील बाजुस व्ह्युईंग डेक असेल. ज्यावर पर्यटकांना उभे राहून हाजीअलीसह समुद्राचे तसेच सुर्यास्त पाहता येईल. याबाबतची निविदा प्रक्रिया आता राबवण्यात येत असून लवकरच याची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.
महापालिका मुख्यालयासमोर बांधली पहिली व्ह्युईंग गॅलरी
मुंबई महापालिका मुख्यालयासमोर तत्कालिन ए विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या पुढाकाराने पहिली व्ह्युईंग गॅलरी बांधण्यात आली. मुख्यालयासमोर उभारण्यात आलेली ही गॅलरी आज सेल्फी पॉईंट म्हणून ओळखला जातो. उबाठाचे आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून या व्ह्युईंग गॅलरीचे बांधकाम झाल्याचे बोलले जात असले तर याची मुळ संकल्पना ही तत्कालिन ए विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांची होती. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांव्यतिरिक्त
यापूर्वीचे दोन व्ह्युईंग गॅलरीच्या बांधकामांचे वैशिष्ट्ये
- दादर चैत्यूभूमी व्ह्युईंग गॅलरी
- प्रकल्प खर्च ६.१ कोटी रुपये
- क्षमता : ३०० लोक
- बांधकाम पूर्ण केल्याचा कालावधी : १२
- बांधकामाचा प्रकार : २६ पिलर्सवर आधारीत आरसीसी डेक
- तत्कालिन सहायक आयुक्त : किरण दिघावकर
- लोकार्पण : ०९ फेब्रुवारी २०२२
- मुख्य आकर्षण : वांद्रे वरळी सी लिंक आणि सुर्यास्त
- गिरगाव चौपाटी व्ह्युईंग गॅलरी
- प्रकल्प खर्च ३.५ कोटी रुपये
- क्षमता : ५०० ते १००० लोक
- बांधकाम पूर्ण केल्याचा कालावधी : ६ ते ७ महिने
- बांधकामाचा प्रकार : आऊटफॉल वाहिनीवर आरसीसी गॅलरी
- तत्कालिन सहायक आयुक्त : प्रशांत गायकवाड
- लोकार्पण : १७ एप्रिल २०२२
- मुख्य आकर्षण : मरीन ड्राईव्हची क्वीन नेकलेस आणि सुर्यास्त