Home ब्रेकिंग न्यूज WEH Toilet Project : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर बनवणार तीन आकांक्षी शौचालय

WEH Toilet Project : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर बनवणार तीन आकांक्षी शौचालय

0
WEH Toilet Project : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर बनवणार तीन आकांक्षी शौचालय
मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर बनवणार तीन आकांक्षी शौचालय (Photo AI)

मुंबई (सचिन धानजी)

मुंबई महापालिकेच्यावतीने आता आकांक्षी शौचालय शहरापाठोपाठ पश्चिम उपनगरांत बांधले जाणार आहे. यामध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गावर ३ आणि समुद्र चौपाट्यांवर तसेच रेल्वे स्थानकांशेजारी २ अशाप्रकारे पैसे द्या आणि वापरा तत्वावर शौचालयांची उभारणी केली जाणार आहे. यामध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला, बोरीवली आणि दहिसर याठिकाणी या आकांक्षी शौचालय बांधली जाणार आहेत.

https://www.prahaar.in/2026/10/21/response-now-for-projects-of-radaroda-processing-centers-in-mumbai/

मुंबईतील विविध ठिकाणी कार्यालयीन कामकाजासाठी अथवा पर्यटनाच्या अनुषंगाने येणाऱ्या नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, या हेतुने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आकांक्षी शौचालयांची निर्मिती करण्याचे काम हाती घेण्यात आले.त्याअंतर्गत शहर भागांमध्ये ५ आकांक्षी शौचालयांचे बांधकाम पूर्ण करून ते वापरात आणले आहे. तर वादग्रस्त लायन गेट येथील आकांक्षी शौचालयाच्या बांधकाम आराखड्यात बदल करून भूमिगत शौचालय बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच न्यायालयाशेजारी शौचालयाच्या उभारणीचे काम शिल्लक आहे.

मात्र, आता शहरासोबतरच पश्चिम उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर, बोरीवली आणि वाकोला या तीन ठिकाणी पैसे द्या व वापरा तत्वावर शौचालयांची उभारणी केली जाणार आहे. तसेच समुद्र किनाऱ्यांवरही आता शौचालयांची मागणी होत असल्याने आक्सा चौपाटी, वर्सोवा सागर कुटीर आणि जुहू चौपाटी आदी ठिकाणी शौचालयांची उभारणी केली जाणार आहे. तसेच अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानका शेजारी तसेच डि.एन.नगर मेट्रो रेल्वे स्थानकाशेजारी या शौचालयांची उभारणी केली जाणार आहे. यासाठी निविदा मागवण्यात आली आहे.

सध्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मागाठाणे, मालाड कांदिवली या परिसरात सार्वजनिक शौचालये असून बदलत्या जीवनशैली नुसार मधुमेह, रक्तदाब आदींचे आजार मोठ्याप्रमाणात वाढत आहे. मधुमेही रुग्णांना वारंवार लघुशंकेला जावे लागते, त्यामुळे पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर टप्प्याटप्प्यांवर सार्वजनिक शौचालये उभारण्याची मागणी होत आहे.

आकांक्षी शौचालय कुठे उभारली जाणार

पश्चिम द्रुतगती महामार्गावर कुठे : वाकोला, बोरीवली, दहिसर

समुद्र चौपाट्यांवर कुठे : आक्सा, वर्सोवा, जुहू

रेल्वे स्थानकाशेजारी कुठे : अंधेरी पश्चिम, डि.एन.रोड मेट्रो रेल्वे स्थानक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here