नगर (प्रतिनिधी) : आदर्श गाव हिवरे बाजार येथे नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेनिमित्त मुंबादेवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत सन 2026-27 चा पाण्याचा ताळेबंद सादर करण्यात आला. नवरात्रोत्सवात पाण्याचा ताळेबंद मांडण्याची परंपरा गावाने सलग 22 व्या वर्षीही कायम ठेवली. यावेळी बोलताना अहिल्यानगरचे धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांनी, पावसाचा हिशेब मांडून त्यानुसार पाण्याचे नियोजन करणारे हिवरे बाजार हे देशातील पहिले गाव असल्याचे प्रतिपादन केले.(HIWARE BAZAR)
या ग्रामसभेला आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर, उपसंचालक ऋषिराज गोसकी, तहसीलदार मिलिंद कुलथे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, नायब तहसीलदार अभिजित वांढेकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक सोहम साळुखे ,विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे, ॲड. विक्रम वाडेकर आदी उपस्थित होते.
https://www.prahaar.in/2026/10/18/horrific-accident-at-nanduri-in-the-middle-of-the-night-police-sub-inspector-killed-over-11-others-injured/
पद्मश्री पवार यांनी गावाच्या पाणी स्थितीची माहिती देताना सांगितले की, नवरात्री उत्सव अनादीकाळापासून असून त्यात पाण्याची गुणवत्ता, बियाण्याची उगवणक्षमता व 9 माळी म्हणजे परागीकरण म्हणून नवरात्री उत्सव हा मानवी भवितव्याची पाणी व आरोग्य सुरक्षितेची परंपरा आहेत त्याला फक्त भक्ती व पूजेचे स्वरूप दिले आहे .हिवरे बाजारने नवरात्र भक्तीला कृषीची जोड दिली त्यामुळेच हिवरे बाजार पर्यावरणसंतुलित दारिद्र्यमुक्त गाव झाले आहे. सन 1995 पासून हिवरे बाजारमध्ये पाण्याच्या ताळेबंदाच्या आधारे पीकपद्धतीचे नियोजन केले जात आहे. गावात एकूण 439 विहिरी असून, त्यापैकी 430 विहिरींना सध्या पाणी आहे, तर नऊ विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गावातील सहा हातपंपांपैकी एका हातपंपातच सध्या पाणी येत आहे. सार्वजनिक नळपाणीपुरवठ्याच्या विहिरीतही पाणी उपलब्ध असून, प्रत्येक कुटुंबाला दोन दिवसांतून एकदा 500 लिटर पाणी दिले जात आहे.गेल्या 20 वर्षांत नळपाणीपुरवठा योजनेवर दुरुस्तीचा खर्च अवघा 80 हजार असून पाणीयोजना महिला चालवितात.
गावात तीन ठिकाणी पर्जन्यमापक बसविण्यात आले आहेत. गिरिमहाराज मंदिर परिसरात 46.7 मिलिमीटर, चोपाळा येथील गणपती मंदिर परिसरात 22.4 मिलिमीटर, तर निंबाचा मळा येथे 53.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या नोंदींनुसार गावातील सरासरी पर्जन्यमान 40.9 मिलिमीटर आहे. शेजारील चास आणि केडगाव शासकीय मंडळांत अनुक्रमे 51.1 आणि 56.1 मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. हिवरे बाजारच्या इतिहासातील हे सर्वांत कमी पर्जन्यमान असल्याचे नमूद करत पवार म्हणाले की, उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन केल्यामुळे जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत गावाला बाहेरून पाणी आणण्याची गरज भासणार नाही, असा अंदाज आहे. भूजलाचा अनियंत्रित उपसा करून आर्थिक समृद्धी मिळविण्याचा हव्यास कमी केला आणि सामाजिक शिस्त पाळली, त्यामुळेच गावाला या संकटाचा सामना करणे शक्य होत आहे.
https://www.prahaar.in/2026/10/18/kolkata-stampede-stampede-at-a-durga-puja-pandal-in-kolkata-19-dead-25-injured/
सन 2026-27 च्या पाण्याच्या ताळेबंदानुसार, चार दिवसांत झालेल्या 40.9 मिलिमीटर पावसातून गावाच्या शिवारात सुमारे 39.95 कोटी लिटर पाणी उपलब्ध झाल्याची नोंद आहे. त्यापैकी गावाच्या वापरासाठी 27.05 कोटी लिटर पाणी उपलब्ध असल्याचे सादरीकरणात नमूद करण्यात आले. गावाच्या विविध गरजांसाठी वार्षिक 35.23 कोटी लिटर पाण्याची आवश्यकता असल्याने उपलब्धता आणि गरज यामध्ये तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे आणि पिकांचे नियोजन उपलब्ध पाण्यानुसार करणे अत्यावश्यक आहे.(WATER RESTRICTION)
पाण्याच्या अंदाजपत्रकात लोकसंख्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी 7.71 कोटी लिटर, खरीप पिकांसाठी 27 कोटी लिटर, रब्बी पिकांसाठी 126.5 कोटी लिटर, प्रस्तावित उन्हाळी पिकांसाठी 24 कोटी लिटर, बारमाही पिकांसाठी 21 कोटी लिटर आणि इतर वापरासाठी 0.54 कोटी लिटर पाण्याची गरज नमूद करण्यात आली आहे. तथापि, या उपघटकांची बेरीज आणि एकूण वार्षिक गरजेची नोंद यामध्ये तफावत दिसत असल्याने अंतिम प्रसिद्धीपूर्वी आकडेवारीची पडताळणी आवश्यक आहे. ताळेबंदात भविष्यासाठी 8.17 कोटी लिटर पाण्याची तूट दर्शविण्यात आली असून, मागील वर्षी साठविलेल्या 2.68 कोटी लिटर राखीव भूजलाचा वापर करून पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्याचे नियोजन करावे लागणार आहे.
या ग्रामसभेला सरपंच विमलताई ठाणगे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे व्हा. चेअरमन रामभाऊ चत्तर, बाबासाहेब गुंजाळ, सखाराम पादीर सर यांच्यासह ग्रामस्थ, तरुण मंडळ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.