Home ताज्या घडामोडी Kolkata Stampede: अरुंद प्रवेशद्वार, अंधार अन् अफवा; दुर्गापूजा मंडपातील चेंगराचेंगरीचं कारण काय?

Kolkata Stampede: अरुंद प्रवेशद्वार, अंधार अन् अफवा; दुर्गापूजा मंडपातील चेंगराचेंगरीचं कारण काय?

0
Kolkata Stampede: अरुंद प्रवेशद्वार, अंधार अन् अफवा; दुर्गापूजा मंडपातील चेंगराचेंगरीचं कारण काय?

कोलकाता येथील चोरबागान दुर्गा पूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर, आयोजकांच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, तपासात पूजा आयोजकांकडून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवस्थापन झाल्याचे ठोस पुरावे समोर आले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणतीही पुरेशी व्यवस्था करण्यात आली नव्हती. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तपासाचा भाग म्हणून सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात आले असून स्थानिक रहिवासी आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यांच्या मते, मंडपातील सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी होती. या अपघाताची काही संभाव्य कारणे समोर आली आहेत.

1 ) प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचे रस्ते छोटे असल्याने

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा लोकांनी प्रवेशद्वारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवेशद्वाराची अरुंदता आणि त्याकडे जाणाऱ्या मार्गामुळे हालचालीत अडथळा निर्माण झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रवेश, बाहेर पडणे आणि गर्दीच्या हालचालींबाबत घोषणा करण्यात आल्या, ज्यामुळे भाविकांमध्ये गोंधळ निर्माण झाला.

2) मंडप कोसळल्याची अफवा

पश्चिम बंगालचे अग्निशमन मंत्री कौशिक चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मंडप कोसळण्याच्या अफवा आणि बाहेर पाऊस सुरु असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

https://www.prahaar.in/2026/10/18/kolkata-stampede-stampede-at-a-durga-puja-pandal-in-kolkata-19-dead-25-injured/

3) मंडपाची भुलभुलैयारखी रचना

मंत्री कौशिक चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, मंडपाची रचना ही भुलभुलैयासारखी होती. आत अंधार होता आणि तिथे रोषणाईचा कार्यक्रम सुरु होता. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांना एकाच ठिकाणी गर्दी करावी लागली. यामुळे गर्दीचा दबाव वाढून चेंगराचेंगरी झाली.

4) मंडप रिकामा करण्याच्या घोषणा

तपासात असे उघड झाले आहे की, चेंगराचेंगरी होण्यापूर्वी मंडप रिकामा करण्याची घोषणा करण्यात आली होती. पोलीस सध्या घटनेच्या व्हिडिओ फुटेजची तपासणी करत आहेत. या व्हिडिओमध्ये लोकांना सांगितले जात आहे की, मंडपाची रचना कोसळणार आहे आणि त्यांनी तात्काळ जागा रिकामी करावी. ही घोषणा कोणी केली, याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.

दुर्गापूजा उत्सवाच्या सप्तमीच्या दिवशी, म्हणजेच शनिवारी सायंकाळी सुमारे 7:40 वाजता चोरबागान दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी झाली. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. दरम्यान, रविवारी सकाळी कोलकाता पोलीस आयुक्त अजय कुमार नंदा यांनी उत्तर कोलकातामधील चोरबागान सार्वजनिक दुर्गा पूजा मंडपाच्या परिसरामध्ये कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले. या आदेशानुसार, कार्यक्रमाच्या ठिकाणाच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर गर्दी करण्यास मनाई आहे. या परिसरात २० ऑक्टोबरपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १६३ लागू करण्यात आले आहे. या प्रकरणी दुर्गापूजा समितीचे सचिव राज कुमार सेवड आणि उपाध्यक्ष शांतनु दुबे यांच्यासह बांबूची रचना उभारण्याचे काम करणारे बिप्लब मुखर्जी यांना अटक करण्यात आली आहे. तसेच गर्दी नियंत्रणाची जबाबदारी असलेले कौशिक साहा आणि पिंटू डे, तर खासगी सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित सुमन चक्रवर्ती आणि राजेश पाल यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here