Home महाराष्ट्र नाशिक Nashik News : सरकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याने संपवलं जीवन , नाशिकमध्ये खळबळ

Nashik News : सरकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याने संपवलं जीवन , नाशिकमध्ये खळबळ

0
Nashik News : सरकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याने संपवलं जीवन , नाशिकमध्ये खळबळ

Malegaon News : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मालेगाव शहरातील सहकार निबंधक कार्यालयातील विशेष लेखापरीक्षक वर्ग-२ पदावर कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने थेट कार्यालयातच गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रतिभा दिलीप ठाकरे (वय ५५) असे गळफास घेतलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव असून, या दुर्दैवी घटनेमुळे मालेगाव शहरासह नाशिक जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

कार्यालयात आढळला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास प्रतिभा ठाकरे या कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. कार्यालयातील महिला शिपाई कामावर आल्यानंतर ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर तातडीने वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आवश्यक पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

https://www.prahaar.in/2026/10/16/nashik-crime-death-penalty-for-the-monster-vijay-khairnar-sentenced-to-death-in-the-dongrale-girl-sexual-assault-and-murder-case-a-major-verdict-by-the-fast-track-court/

मानसिक तणावातून टोकाचे पाऊल ?

प्रतिभा ठाकरे यांच्यावर एका पतसंस्थेच्या लेखापरीक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. संबंधित पतसंस्थेत सुमारे सहा कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप असल्याची माहिती समोर आली आहे. हे लेखापरीक्षण लवकर पूर्ण करून अहवाल सादर करण्यासाठी त्यांच्यावर वरिष्ठांकडून दबाव होता, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या कामामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय त्यांचे जावई महेश भोये यांनी व्यक्त केला. मात्र, कार्यालयीन दबाव आणि प्रतिभा ठाकरे यांच्या मृत्यूचा थेट संबंध असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. या आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.

मृत्यूच्या आदल्या रात्री जावयाशी झाले होते फोनवर बोलणे

प्रतिभा ठाकरे यांच्या कुटुंबीयांवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर त्यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मृत्यूच्या आदल्या दिवशी रात्री त्यांचे जावई महेश भोये यांच्याशी फोनवरून शेवटचे बोलणे झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी ही घटना घडल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

कार्यालयीन दबाव होता का ? पोलिसांकडून चौकशी

प्रतिभा ठाकरे यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कथित गैरव्यवहाराच्या लेखापरीक्षणासंदर्भात त्यांच्यावर दबाव होता का, संबंधित कार्यालयातील कामकाजाचा त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला होता का आणि या प्रकरणात इतर कोणाची भूमिका आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. सध्या कॅम्प पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, अधिकृत तपासातूनच मृत्यूमागील परिस्थिती स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here