पनामा : मध्य अमेरिकेतील पनामा देशात दोन शक्तिशाली भूकंपांचे धक्के बसल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच, मंगळवारी (13 ऑक्टोबर) सकाळी पुन्हा एकदा 6.1 तीव्रतेच्या जोरदार भूकंपाने पनामा हादरला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर होता. वारंवार बसणाऱ्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी पहाटे भारतीय वेळेनुसार 4 वाजून 50 मिनिटांनी झालेल्या या शक्तिशाली भूकंपामुळे रस्ते आणि इमारतींचे पुन्हा एकदा नुकसान झाले. पहाटेच अचानक धक्के जाणवल्याने नागरिकांनी सुरक्षिततेसाठी तातडीने घराबाहेर पडून मोकळ्या जागांकडे धाव घेतली.
आधीच्या भूकंपांची तीव्रता आणि दहशत
यापूर्वी, शुक्रवारी रात्री उशिरा आणि शनिवारी पहाटे पनामामध्ये 7.7 आणि 6.6 तीव्रतेचे दोन मोठे भूकंपाचे धक्के बसले होते. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेच्या (USGS) माहितीनुसार, शुक्रवारी झालेल्या 7.7 तीव्रतेच्या भूकंपाचा केंद्रबिंदू पनामाच्या दक्षिणेकडील टोकाजवळ होता, ज्याचे धक्के राजधानी पनामा सिटीपर्यंत जाणवले. या भीषण भूकंपामुळे अनेक इमारतींच्या भिंतींना तडे गेले असून, नागरिकांनी संपूर्ण रात्र उघड्यावर मोकळ्या जागेत घालवली.
https://www.prahaar.in/2026/10/12/nobel-prize-2026-economics-winners-robert-hall-michael-woodford/
देशात आणीबाणी जाहीर
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पनामा सरकारने मदत आणि बचावकार्याला वेग देण्यासाठी तसेच बाधित भागांतील नागरिकांना तातडीने मदत पुरवण्यासाठी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. दरम्यान, भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे नागरिक अद्यापही दहशतीखाली असून सुरक्षिततेचा उपाय म्हणून घरांमध्ये परतण्यास तयार नाहीत.