Home ब्रेकिंग न्यूज Maharashtra weather : महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट’चा जोर वाढला; मुंबईसह कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा

Maharashtra weather : महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट’चा जोर वाढला; मुंबईसह कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा

0
Maharashtra weather : महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट’चा जोर वाढला; मुंबईसह कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा

महाराष्ट्रात सध्या उन्हाचा चटका वाढत असून, अनेक भागांत नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. ऑक्टोबर हिटचा प्रभाव जाणवत असताना काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. 13 ऑक्टोबर रोजी कोकण विभागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून, राज्यातील इतर भागांत प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे.

हवामानाच्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या 5 जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाचा त्रास जाणवू शकतो. काही ठिकाणी आकाश ढगाळ राहण्याची शक्यताही आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. वाढलेल्या आर्द्रतेमुळे तापमान फार जास्त नसले तरी उकाडा अधिक जाणवू शकतो.

पुढील दिवसात हवामान बदलण्याची शक्यता

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत पावसाची शक्यता कमी असून, कमाल तापमान 33 ते 34 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. या भागांत पुढील 4 ते 5 दिवस हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतही उन्हाचा प्रभाव कायम आहे. येथे कमाल तापमान 32 अंश, तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. पुढील 2 ते 3 दिवसांनंतर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात हवामान कोरडं 

मराठवाड्यात सध्या कोरडे हवामान असून, काही भागांतील कमाल तापमान 34 अंशांपर्यंत पोहोचले आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूरसह अनेक जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. येथे कमाल तापमान 34 ते 36 अंश, तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे, उन्हात बाहेर पडताना काळजी घ्यावी आणि दुपारच्या वेळेत शक्यतो थेट उन्हात जाणे टाळावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here