मुंबई : मुंबईतील बहुप्रतिक्षित आणि अतिशय महत्त्वाचा असा सायन रेल्वे उड्डाणपूल (Sion ROB) अजून लोकांच्या वापरासाठी अधिकृतपणे खुला करण्यात आलेला नाही. मात्र, या पुलावरून काही नागरिक आणि बाईकर्सनी अनधिकृतपणे प्रवास केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ समोर आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने (BMC) तातडीने पावले उचलत पुलाचे प्रवेशद्वार बॅरिकेट्स लावून पूर्णपणे सील केले आहे.
इन्स्टाग्रामवरील व्हिडिओमुळे फुटले बिंग
View this post on Instagram
‘आयझॅक नाझरेथ’ नावाच्या एका सोशल मीडिया कन्टेन्ट क्रिएटरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तो नुकत्याच तयार झालेल्या सायन पुलावर चालताना दिसत आहे. व्हिडिओची सुरुवात करताना तो म्हणतो, “मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे.” या व्हिडिओमध्ये काही पादचारीदेखील या पुलाचा वापर करताना पाहायला मिळाले. याशिवाय, सायन, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि कुर्ला दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी हा पूल किती महत्त्वाचा आहे, हे त्याने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले. तसेच, पुलाच्या कामाने धारावीकरांना गेल्या काही दिवसांत झालेल्या त्रासाचाही त्याने उल्लेख केला. त्यानंतर गुरुवारी ‘निकेत पवार’ नावाच्या दुसऱ्या युजरने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये एक तरुण बाईकवरून या नव्या पुलावरून जाताना दिसत असून त्याच्या मागे इतर काही जणही असल्याचे दिसत होते.
https://www.prahaar.in/2026/10/10/no-need-for-expensive-items-decorate-mata-ranis-shrine-using-sarees-and-dupattas-from-your-home-check-out-these-5-simple-tips/
व्हायरल व्हिडिओनंतर बीएमसीकडून त्वरित कारवाई
View this post on Instagram
सोशल मीडियावर हे व्हिडिओ वेगाने व्हायरल झाल्यानंतर शनिवारी सकाळी समोर आलेल्या नवीन अपडेटनुसार, महापालिका प्रशासनाने पुलावर अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. युजर निकेत पवारने आपल्या नवीन पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आता बीएमसी प्रशासनाने पुलाचे सर्व रस्ते बॅरिकेट्स लावून पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद (सीलबंद) केले आहेत.” पुलाचे काम अद्याप पूर्णत्वास जात असून प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसताना नागरिकांनी अशी खबरदारी न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
११२ वर्षे जुन्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात
दरम्यान, सुमारे ११२ वर्षे जुना असलेला हा सायन रेल्वे पूल जीर्ण झाल्यामुळे पाडण्यात आला होता, ज्याचे पुनर्बांधणीचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) हा पूल १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, जे मूळ मुदतीपेक्षा तब्बल चार महिने आधी आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी १७ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष साइटवर जाऊन कामाची पाहणी केली होती आणि काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. हा पूल सुरू झाल्यानंतर सायन-धारावी-कुर्ला-एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांसाठी पुनर्रचना
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP-2) अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि कुर्ला दरम्यान प्रस्तावित असलेल्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांच्या कामासाठी जुना पूल पाडण्यात आला होता. रेल्वे रुळांवरील मुख्य पुलाचे काम मध्य रेल्वे करत आहे, तर महापालिकेचा पूल विभाग (Bridges Department) रेल्वेच्या समन्वयाने जोडणाऱ्या रस्त्यांचे काम पाहत आहे. हा नवीन पूल ५४.५ मीटर लांबीचा आणि २९ मीटर रुंदीचा असणार आहे. पूल सुरू झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून ट्रॅफिक आणि डायव्हर्शनमुळे त्रस्त झालेल्या लाखो मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.