Home ब्रेकिंग न्यूज Navnath Ban on Congress: एसआयआरनंतर काँग्रेसचा विजय, तरी मतचोरीचा आरोप! नवनाथ बन यांचा राहुल गांधींना टोला

Navnath Ban on Congress: एसआयआरनंतर काँग्रेसचा विजय, तरी मतचोरीचा आरोप! नवनाथ बन यांचा राहुल गांधींना टोला

0
Navnath Ban on Congress: एसआयआरनंतर काँग्रेसचा विजय, तरी मतचोरीचा आरोप! नवनाथ बन यांचा राहुल गांधींना टोला

ज्या एसआयआरचे निमित्त करून राहुल गांधी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत त्याच एसआयआरनंतर केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले, याचा राहुल गांधींना विसर पडला आहे. एसआयआरनंतर तामिळनाडूमध्ये टीव्हीके या भाजपाविरोधी पक्षाचा विजय झाला. तरीही मतचोरीचा आरोप करणारे राहुल गांधी दुटप्पी, ढोंगी आहेत, अशी घणाघाती टीका भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बन म्हणाले की, देशभरात एसआयआरची प्रक्रिया अचानक पार पडली नाही. चार ते पाच महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. प्रत्येक पक्षाला आपला बीएलओ देण्याची संधी दिली होती. एसआयआरच्या माध्यमातून देशभरातील एकूण 95 कोटी मतदारांपैकी 82 कोटी, म्हणजे जवळपास 88 टक्के मतदारांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उरलेल्या सुमारे 13 कोटींमध्ये स्थलांतरित, दुबार नावे आणि मृतांचा समावेश आहे. जवळपास 2.89 कोटी मतदार मृत तर सुमारे 1.1 कोटी दुबार मतदार होते. उर्वरित मतदारांना फॉर्म सहा भरून पुन्हा मतदार होता येणार असल्याने जाणीवपूर्वक नावे वगळण्याचे काम निवडणूक आयोगाने केलेले नाही. तामिळनाडू, केरळमध्ये एसआयआरची प्रक्रिया होत टीव्हीके, काँग्रेसचा विजय झाला तेव्हा ही एसआयआरची प्रक्रिया अतिशय चांगली म्हणून तिचे कौतुक करणारे केरळमधील काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथला होते. मग केरळमधला एसआयआर चांगला आणि महाराष्ट्रातला एसआयआर वाईट. तामिळनाडूमधला एसआयआर चांगला, पश्चिम बंगालमधला एसआयआर वाईट, अशी पोटदुखी का, असा सवाल नवनाथ बन यांनी अभिजित दीपके यांना विचारला.

https://www.prahaar.in/2026/10/10/bharat-jadhav-and-pushkar-shrotri-face-off-in-a-legal-battle-kon-yashwant-pansare-is-set-to-premiere-on-zee5-marathi/

मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करतात पण या देशात ईव्हीएम नेमके कुणी आणले, असा सवाल करीत श्री. बन म्हणाले, काँग्रेसचे सरकार आणि राजीव गांधी पंतप्रधान असताना ईव्हीएमची सुरुवात झाली. त्यामुळे आपले वडील चुकीचे होते का, हे एकदा राहुल गांधींनी सांगितले पाहिजे. मल्लिकार्जुनजी खरगे 2014 पर्यंत तुमचे सरकार याच ईव्हीएमवर निवडून येत होते तेव्हा ईव्हीएम चांगले होते का? त्यावेळी तुम्ही बॅलेट पेपरची मागणी का केली नाही? आताही केरळ, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये तुमचे सरकार याच ईव्हीएमवर निवडून आले तेव्हा तुम्ही बॅलेट पेपरची मागणी का केली नाही? खरगे साहेब, हे डबल ढोलकी वाजवणे बंद करा. या देशात जनतेने तुमचा, काँग्रेस आणि राहुल गांधींचा ढोलक वाजवलेला आहे, असा टोलाही बन यांनी लगावला .

1990 ते 1996 पर्यंत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तपदी असलेल्या टी. एन. शेषन यांनी पद सोडल्यानंतर 1999 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लालकृष्ण अडवाणींच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली. परंतु लालकृष्ण अडवाणींच्या पाठीशी जनता असल्याने टी. एन. शेषन यांचा दारुण पराभव झाला. 1996 ते 2001 या काळातील मुख्य निवडणूक आयुक्त एम. एस. गिल निवृत्त झाल्यानंतर त्यांनी जाहीरपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2004 ते 2016 या काळात पंजाबमधून ते राज्यसभेवर खासदार होते. यूपीएच्या सरकारमध्ये ते क्रीडामंत्री झाले. मग गिल आणि तुमचे संबंध काय होते? अनेक निवडणूक आयुक्तांना राज्यसभेवर पाठवले अथवा राज्यपाल म्हणून पाठवले. काहींना निवडणूक लढायला लावली. कुणाला क्रीडामंत्री तर कुणाला कायदामंत्री केले. हा काँग्रेसचा इतिहास आधी राहुल गांधींनी आठवावा आणि मग एसआयआरच्या, ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात करावी. ज्ञानेश कुमार हे मोदींच्या मांडीवर बसल्याचे राहुल गांधींना वाटत असेल तर 1950 ते 1958 या काळात मुख्य निवडणूक आयुक्त असेलल्या सुकुमार सेन यांचे धाकटे बंधू अशोक कुमार सेन हे 1957 मध्ये काँग्रेसचे लोकसभा खासदार होत त्याचवर्षी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सरकारमध्ये कायदामंत्री झाले. ये रिश्ता क्या कहलाता है? राहुल गांधी, एवढेच नाही तर 1982 ते 1985 या काळातील मुख्य निवडणूक आयुक्त आर. के. त्रिवेदी यांची 1986 ते 1990 या काळात तुमच्याच वडिलांनी, राजीव गांधी यांनी कशाच्या बदल्यात गुजरातचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली होती, हा इतिहास एकदा वाचा, असेही नवनाथ बन यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here