मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील लोक भवन येथे एका दिमाखदार सोहळ्यात 103 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य, विशिष्ट सेवा आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी प्रतिष्ठित पोलीस पदके प्रदान करण्यात आली. भारताच्या राष्ट्रपतींकडून 2022 ते 2024 या कालावधीतील स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर झालेली ही पदके शुक्रवारी सन्मानपूर्वक वितरीत करण्यात आली.
या विशेष समारंभात राष्ट्रपती शौर्य पदके (2), शौर्य पदके (18), राष्ट्रपतींचे विशिष्ट सेवेसाठीचे पोलीस पदक (3), उत्कृष्ट सेवेसाठीचे पोलीस पदक (4), पोलीस पदके (40) आणि गुणवत्तापूर्ण सेवा पदके (36) अशा एकूण 103 पदकांचा गौरव करण्यात आला.
प्रमुख सन्मानित अधिकारी
या सोहळ्यात उत्कृष्ट आणि कर्तव्यकठोर सेवेबद्दल राज्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला, ज्यामध्ये प्रामुख्याने खालील अधिकाऱ्यांचा समावेश होता:
• निकेत कौशिक (पोलीस आयुक्त, मीरा-भयंदर, वसई-विरार)
• विनय कुमार चौबे (पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड)
• प्रवीण साळुंखे (अतिरिक्त पोलीस महासंचालक, वाहतूक)
• मधुकर पांडे (अतिरिक्त पोलीस महासंचालक, प्रशासन)
• प्रवीण कुमार पाडवळ (पोलीस महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा)
• निशीथ मिश्रा (पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण आणि विशेष पथके)
https://www.prahaar.in/2026/10/09/pandharpur-wari-documentary-created-under-the-initiative-of-cm-devendra-fadnavis-honored-at-the-global-level/
मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न
या कार्यक्रमाला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) मनीषा म्हैस्कर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, अतिरिक्त पोलीस महासंचालक (एटीएस) नवल बजाज यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सन्मानित जवानांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या सुमधूर स्वरांमध्ये या शानदार सोहळ्याची सुरुवात आणि सात्तांग पार पडली.
या प्रसंगी बोलताना राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी पोलीस दलाच्या धाडसाची आणि अहोरात्र सुरू असलेल्या सेवाभावाची मुक्तकंठानं प्रशंसा केली. कायदा व सुव्यवस्था राखण्यात आणि सार्वजनिक सुरक्षा अबाधित ठेवण्यात महाराष्ट्राच्या पोलिसांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.