Home एक्सक्ल्युजिव्ह Municipal Hospitals Digital Payment : महानगरपालिका दवाखाने, आपला दवाखाना येथे डिजिटल पेमेंट सुविधा, अतिरिक्‍त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांचे निर्देश

Municipal Hospitals Digital Payment : महानगरपालिका दवाखाने, आपला दवाखाना येथे डिजिटल पेमेंट सुविधा, अतिरिक्‍त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांचे निर्देश

0
Municipal Hospitals Digital Payment : महानगरपालिका दवाखाने, आपला दवाखाना येथे डिजिटल पेमेंट सुविधा, अतिरिक्‍त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांचे निर्देश

मुंबई विशेष प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेतील दवाखाने, नागरी आरोग्य केंद्र, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आदी ठिकाणी बाह्यरूग्‍ण सेवेसाठी येणाऱ्या रूग्णांना डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून द्यावा , असे स्‍पष्‍ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन १००० दिवस ’ उपक्रमाच्या अनुषंगाने माता व बालकांच्या आरोग्य व पोषणविषयक सेवांचा अधिक प्रभावीपणे व परिणामकारक पद्धतीने विस्तार करावा. त्यांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असेदेखील निर्देश वर्मा यांनी दिले.

अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी गुरुवारी ८ ऑक्‍टोबर २०२६ रोजी मालाड – मालवणी परिसरातील अंगणवाडी व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली. त्‍यावेळी त्‍यांनी निर्देश दिले.

मालवणी – २ येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन रुग्ण नोंदणीसाठी वापरण्यात येणाऱ्या हॉस्पिटल मॅनेजमेंट इंन्फॉरमेशन सिस्टीमच्या कामकाजाची पाहणी करण्यात आली. रुग्ण नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ व नागरिकाभिमुख करण्यासाठी ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथेही रुग्ण नोंदणीसाठी ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केली. सर्व दवाखाने, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याठिकाणी ‘पॉज’ मशीनची उपलब्धता करून देण्यात यावी. तसेच डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा, अशाही सूचना त्यांनी केल्‍या.

मालाड (मार्वे मार्ग) येथील अंगणवाडी केंद्रास भेटीदरम्यान श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची पाहणी केली. दैनंदिन आहाराचे स्वरूप, मासिक पोषण आहाराचे वितरण तसेच बालकांच्या आरोग्य व पोषणविषयक नोंदींची माहिती घेतली. बालकांच्या आरोग्यविषयक माहितीच्या नोंदणी व देखरेखीसाठी राज्य शासनामार्फत वापरण्यात येणाऱ्या प्रणालीच्या कामकाजाचाही त्यांनी आढावा घेतला.

आशा सेविका व आरोग्य सेविकांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध माता-बाल आरोग्य, पोषण व प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला. विशेषतः ‘मिशन १००० दिवस ’ अंतर्गत गर्भधारणेपूर्व काळापासून बालकाच्या पहिल्या दोन वर्षांपर्यंतच्या कालावधीत माता व बालकांच्या पोषण, आरोग्य, वाढ व विकासावर लक्ष केंद्रित करून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती त्यांनी जाणून घेतली. तसेच पावसाळी आजार, संसर्गजन्य आजार व क्षयरोगाच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि क्षेत्रीय स्तरावर आशा सेविका व आरोग्य सेविकांमार्फत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. आरोग्य सेवा अधिक परिणामकारक, सुलभ व तंत्रज्ञानस्नेही करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध डिजिटल उपक्रमांबाबतही श्रीमती वर्मा यांनी माहिती घेतली.

पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त कुंदन वळवी, पी पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त रूपाली सरमळकर, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा पुरी तसेच सहायक आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

कॉम्प्रिहेन्सिव्ह थॅलेसेमिया केअर बाल रक्तदोष – कर्करोग व बीएमटी केंद्राची कामगिरी कौतुकास्पद

बोरिवलीतील कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसेमिया केअर, बालरोग रक्तदोष, कर्करोग व बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्राचे कार्य उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी गुरुवारी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी रोजी दिलेल्या प्रत्यक्ष भेटीदरम्यान काढले.

बोरिवली (पूर्व) येथील मुंबई महानगरपालिकेच्या कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसेमिया केअर, बालरोग रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्रामुळे अनेक बालकांना सामान्य जीवन जगण्यास मदत झाली आहे. बोनमॅरो प्रत्यारोपणामुळे थॅलेसेमिया रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात, असा विश्वास निर्माण करण्यामध्ये महानगरपालिका यशस्वी झाली आहे. एकूणच बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्राचे कार्य उल्लेखनीय आहे, अशा शब्दात प्राजक्ता लवंगारे यांनी केंद्राच्या कामगिरीचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here