Home ब्रेकिंग न्यूज Ashish Shelar : सावनेरमधील राम गणेश गडकरी स्मारकाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी!

Ashish Shelar : सावनेरमधील राम गणेश गडकरी स्मारकाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी!

0
Ashish Shelar : सावनेरमधील राम गणेश गडकरी स्मारकाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी!
Ashish Shelar (5)

आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी दिली स्मारकाची सविस्तर माहिती; संवर्धन व विकासकामांना चालना मिळण्याची अपेक्षा

सावनेर : मराठी साहित्यविश्वातील महान नाटककार व विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांच्या सावनेर येथील ऐतिहासिक निवासस्थानाला महाराष्ट्राचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी भेट देऊन स्मारकाची पाहणी केली. सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या पाहणीदरम्यान स्मारकाची सद्यस्थिती, संवर्धन तसेच आवश्यक विकासकामांचा आढावा घेण्यात आला.

https://www.prahaar.in/2026/10/07/over-3-7-million-applications-received-from-across-the-state-for-the-woman-farmer-certificate-an-enthusiastic-response/

सावनेर येथे पोहोचल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांनी राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर आमदार डॉ. आशिषराव देशमुख (Ashishrao Deshmukh) यांनी मंत्री शेलार यांना स्मारक परिसराची पाहणी करून घेत गडकरी यांच्या जीवनाशी आणि साहित्यिक कारकिर्दीशी संबंधित विविध ऐतिहासिक बाबींची सविस्तर माहिती दिली. स्मारकात जतन करण्यात आलेल्या गडकरी यांच्या दुर्मिळ छायाचित्रांसह त्यांच्या गाजलेल्या नाटकांतील विविध प्रसंगांची छायाचित्रे व तत्कालीन प्रसिद्ध नाटककारांशी संबंधित साहित्याचीही पाहणी करण्यात आली.

राम गणेश गडकरी हे ‘गोविंदाग्रज’ आणि ‘बाळकराम’ या टोपणनावांनी मराठी साहित्यविश्वात प्रसिद्ध होते. ‘मराठीचे शेक्सपियर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडकरी यांच्या जीवनातील अखेरचा काळ सावनेर येथे गेला. २३ जानेवारी १९१९ रोजी वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी त्यांनी सावनेरच्या भूमीत अखेरचा श्वास घेतला. याच निवासस्थानी वास्तव्य करत असताना त्यांनी आपल्या साहित्यिक कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण लेखन केले. ‘एकच प्याला’ आणि ‘भावबंधन’ यांसारख्या अजरामर साहित्यकृतींच्या निर्मितीशी या भूमीचा जवळचा संबंध आहे.

गडकरी वाडा म्हणूनही ओळखले जाणारे हे निवासस्थान सध्या महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या अखत्यारित असून राज्य संरक्षित स्मारक म्हणून त्याचे जतन करण्यात येत आहे. स्मारकाच्या खोल्यांमध्ये राम गणेश गडकरी यांच्या जीवनाशी संबंधित अनेक दुर्मिळ छायाचित्रे व ऐतिहासिक आठवणी जतन करण्यात आल्या आहेत. यावेळी आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी स्मारकाच्या अधिक विकासासाठी तसेच त्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे प्रभावी संवर्धन करण्याची गरज व्यक्त केली. सावनेरच्या या ऐतिहासिक ठेव्याला अधिक चांगल्या स्वरूपात विकसित करून साहित्यप्रेमी, पर्यटक आणि नव्या पिढीला या वारशाची ओळख करून देण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पाहणीवेळी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. मंत्री आशिष शेलार यांच्या पाहणीमुळे सावनेरच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनाला तसेच राम गणेश गडकरी स्मारकाच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here