Nashik News : नाशिक जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक वास्तव समोर आले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव येथील बाळाचा मृत्यू झालेल्या दुर्दैवी माता-पित्यांना दुचाकीवरून त्याचा मृतदेह पोटाशी धरून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावी जाण्याची वेळ आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
प्रसूतीनंतर नवजात बाळाचा मृत्यू
बोर्डाची वाडी येथे मेंगाळ कुटुंब दुसऱ्याच्या शेतात काम करून उदरनिर्वाह करते. मंगेश मेंगाळ यांच्या पत्नी संगिता यांना गुरुवारी सायंकाळी प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्याचबरोबर त्यांना छातीतही त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना तातडीने मोखाडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृतीत चढ-उतार होत असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. शुक्रवारी पहाटे दोन वाजता संगिता यांनी एका मुलाला जन्म दिला. मात्र, बाळाच्या जन्माचा आनंद कुटुंबाला फार काळ अनुभवता आला नाही. सकाळी सुमारे ११ वाजता नवजात बाळाचा मृत्यू झाला.
https://www.prahaar.in/2026/10/03/flydubai-incident-attacker-of-smit-macchar-identified-shocking-details-revealed/
बाळाचा मृतदेह घेऊन घरी जाण्यास सांगितल्याचा दावा
बाळाच्या मृत्यूनंतर रुग्णालयाकडून मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे मेंगाळ कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यानंतर त्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले. मात्र, “आमच्याकडे वाहन नाही आणि घरी जाण्यासाठी पैसेही नाहीत,” अशी माहिती कुटुंबीयांनी रुग्णालयातील संबंधितांना दिल्याचे सांगण्यात येते. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालय व्यवस्थापनाकडून वाहन उपलब्ध करून देता येणार नसल्याचे सांगण्यात आले. आईला रुग्णालयातच दाखल ठेवावे आणि शनिवारी घरी जाण्यासाठी वाहन देण्यात येईल, असे सांगण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
…अन् हातात बाळाचा मृतदेह
ही माहिती घरी कळवल्यानंतर मेंगाळ यांचा भाऊ वहिनीसह दुचाकी घेऊन नाशिकला आला. त्यानंतर बाळाचा मृतदेह दुचाकीवरून घरी नेण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. नाशिकहून त्यांच्या गावापर्यंतचे अंतर सुमारे ५० किलोमीटर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नवजात बाळाचा मृतदेह घेऊन दुचाकीवरून करावा लागलेला हा प्रवास आरोग्य व्यवस्थेतील सुविधांबाबत प्रश्न उपस्थित करणारा ठरला आहे. दरम्यान, यामुळे नुकतीच बाळंत असलेल्या मातेचीही प्रकृती बिघडली आहे. आता या मातेला नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
https://www.prahaar.in/2026/10/03/maharashtra-government-ola-uber-like-ambulance-service-one-click/
रुग्णवाहिका योजना, मात्र मृतदेहासाठी सुविधा नाही ?
रुग्णांसाठी १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे. तसेच जननी-शिशु सुरक्षा योजनेअंतर्गत विविध सुविधा दिल्या जातात. मात्र, मृतदेह घरी नेण्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडून शववाहिकेची नियमित व्यवस्था नसल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य विभाग तसेच महानगरपालिकेला राज्य स्तरावरून काही शववाहिका उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, चालक आणि इंधनाच्या प्रश्नामुळे या शववाहिका वापराविना पडून असल्याचा दावा करण्यात येत आहे.
दुर्गम भागातील नागरिकांच्या अडचणींचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे दुर्गम आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आरोग्य सुविधांबरोबरच आपत्कालीन वाहतूक व्यवस्थेचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर मृत्यू झाल्यास मृतदेह सन्मानपूर्वक आणि सुरक्षितपणे घरी पोहोचविण्यासाठी पुरेशी व्यवस्था असणे आवश्यक असल्याची मागणी आता होत आहे. दरम्यान, या घटनेबाबत रुग्णालय प्रशासनाची अधिकृत भूमिका तसेच शववाहिका उपलब्ध न होण्यामागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.