Home क्रीडा रत्नागिरीची सुकन्या आकांक्षा कदम कॅरम वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे करणार प्रतिनिधित्व; इटलीत होणार स्पर्धा

रत्नागिरीची सुकन्या आकांक्षा कदम कॅरम वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे करणार प्रतिनिधित्व; इटलीत होणार स्पर्धा

0
रत्नागिरीची सुकन्या आकांक्षा कदम कॅरम वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे करणार प्रतिनिधित्व; इटलीत होणार स्पर्धा
कॅरम वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आकांक्षा कदम भारताचे प्रतिनिधित्व करणार(Photo:Prahaar)

रत्नागिरी: आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेती, रत्नागिरी जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर उंचावणारी खेळाडू आकांक्षा कदम हिची इटली येथे होणाऱ्या नवव्या कॅरम वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. आगामी 2 ते 5 डिसेंबर या कालावधीत ती या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.(Maharashtra Carrom Player)

देवरूख येथील मूळ रहिवासी असलेल्या आकांक्षाने आपल्या जिद्दीच्या आणि उत्कृष्ट खेळाच्या बळावर क्रीडा क्षेत्रात मोठा मान मिळवला आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तिला राज्य शासनाचा प्रतिष्ठित ‘शिवछत्रपती सर्वोत्कृष्ट खेळाडू राज्य क्रीडा पुरस्कार’, जिल्हा क्रीडा पुरस्कार (गुणवंत खेळाडू) तसेच रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाचा ‘राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.

अशी आहे उज्ज्वल कामगिरी आणि पदकांची कमाई

आकांक्षा हिने बालवयातच कॅरमच्या पटावर आपला दबदबा निर्माण केला आहे. तिच्या प्रमुख कामगिरीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  • आंतरराष्ट्रीय पदार्पण: वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी मालदीव येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत तिने देशाला सुवर्णपदकासह वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून दिले.

  • राज्य आणि राष्ट्रीय यश: वयाच्या 14 व्या वर्षी राज्यस्तरीय महिला ओपन गटाचे विजेतेपद, राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेत 1 सुवर्ण व 2 रौप्य पदके तिने पटकावली.

  • सलग विजेतेपद: सलग तीन वेळा ज्युनिअर राज्यस्तरीय गटाचे विजेतेपद आणि राज्य स्तरावरील महिलांच्या एकेरी ओपन गटाचे तब्बल 15 वेळा विजेतेपद तिने आपल्या नावावर केले आहे.

https://www.prahaar.in/2026/10/02/will-abhishek-sharma-leave-sunrisers-hyderabad-speculation-mounts-amid-reports-of-unhappiness-with-the-team/

आतापर्यंतच्या क्रीडा कारकिर्दीत आकांक्षाने एकूण 62 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये 36 सुवर्णपदके, 13 रौप्यपदके आणि 13 कास्य पदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यातील 4 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक आंतरराष्ट्रीय पातळीवरील आहे, तर 4 सुवर्ण व 2 रौप्यपदके राष्ट्रीय स्तरावरील आहेत.(Maharashtra Carrom Player)

आकांक्षाच्या या जागतिक पातळीवरील निवडीमुळे रत्नागिरीसह संपूर्ण महाराष्ट्रात अभिमानाचे वातावरण असून, क्रीडा वर्तुळातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. इटली येथील जागतिक स्पर्धेत ती देशासाठी सुवर्णपदक जिंकेल, असा विश्वास तिचे प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here