Satara Crime : सातारा जिल्ह्यातील शिरवळ-राजेवाडी रस्त्यालगत १४ सप्टेंबर रोजी आढळलेल्या १९ वर्षीय तरुणीच्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. मृत तरुणीची ओळख पुण्यातील रहिवासी हर्षदा जाधव (१९) अशी पटली असून, या प्रकरणात तिचे वडील आणि चुलते यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचा संशय आहे.
अनोळखी मृतदेहाची ओळख पटली
१४ सप्टेंबर रोजी शिरवळ-राजेवाडी रस्त्यालगत एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला तिची ओळख पटलेली नव्हती. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि स्थानिक पातळीवरील माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. सलग १६ दिवस तपास केल्यानंतर पोलिसांना संशयित वाहनाचा माग काढण्यात यश आले. त्यानंतर मृत तरुणीची ओळख हर्षदा जाधव अशी पटली.
जेवणाच्या बहाण्याने घराबाहेर नेले
पोलिसांच्या तपासानुसार, हर्षदाला जेवणासाठी बाहेर जाण्याच्या बहाण्याने कारमधून घराबाहेर नेण्यात आले. त्यानंतर कारमध्येच तिच्यावर हल्ला करण्यात आला. मिरचीची चटणी तिच्या डोळ्यात आणि तोंडात टाकून तिचा श्वास रोखण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर तिचा मृतदेह सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीजवळील रस्त्यालगत टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
https://www.prahaar.in/2026/10/01/shalarth-id-scam-momentum-gathers-in-the-shalarth-id-scam-investigation-11-special-teams-raid-suspected-schools-in-the-nashik-division/
हत्येचे धक्कादायक कारण समोर
हर्षदा ही घरातील लोकांना शिवीगाळ करायची, वाईट मुलांसोबत रात्रभर बाहेर फिरायची, व्यसन करायची. घरातील लोकांना खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी द्यायची. तिच्या अशा वागण्याला आणि त्रासाला कंटाळून वडील आणि चुलत चुलत्यानेचा तिचा खून केल्याचे उघडकीस आले. हर्षदाला हॉटेलला जेवायला जायचं असल्याचं सांगून वडिल आणि चुलत्याने कारमध्ये बसवलं. त्यानंतर, तिच्या डोळ्यात आणि तोंडात चटणी म्हणजेच लाल मिर्ची घालून हाताने तोंड नाक दाबून तिचा खून केला. त्याच गाडीतून तिचा मृतदेह सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर आणून टाकल्याचा घटनाक्रम तपासात उघडकीस आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली असून पोलिसांनी मुलीच्या वडिलांना आणि चुलत्याला अटक केली आहे.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून आरोपींपर्यंत पोहोचले
हत्येचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळापासून पुणे आणि भोरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. भोर, पुणे, कापूरहोळ, नसरापूर तसेच पुणे-सातारा महामार्ग परिसरातही माहिती संकलित करण्यात आली. स्थानिक माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित वाहनाचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर संशयितांची ओळख पटवून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास शिरवळ पोलीस करत असून, हत्येमागील नेमके कारण, घटनाक्रम आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे.