मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी सर्व संबंधित यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार मुंबईतील पादचाऱ्यांना अडथळामुक्त, सुरक्षित व सलग पदपथ उपलब्ध करून देण्यासाठी पदपथांवरील अनधिकृत अतिक्रमणे व बांधकामे हटविण्याची मोहीम सुरू आहे. या अभियान अंतर्गत आर (मध्य) विभागातील बोरिवली (पश्चिम) परिसरात 20 अनधिकृत बांधकामे आणि 15 अनधिकृत स्टॉल्सवर 29 सप्टेंबर 2026 रोजी कारवाई करण्यात आली.
https://www.prahaar.in/2026/09/30/central-railway-holiday-special-trains-mumbai-madgaon-nagpur/
उपायुक्त (परिमंडळ 7) मनीष वळंजु यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (आर मध्य विभाग) डॉ. प्रफुल तांबे यांच्या नेतृत्वात संबंधित अधिकारी-कर्मचारी व कामगारांच्या पथकाने ही कारवाई केली. बोरिवली पश्चिम येथील लोकमान्य टिळक रोड, मार्केट लेन आणि बोरिवली सबवे रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली. ‘पादचारी प्रथम’ अभियानाच्या पहिल्या टप्प्यात बोरिवली परिसरातील 6 पदपथांवरील एकूण सुमारे 8 किलोमीटर परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
https://www.prahaar.in/2026/09/30/20-cases-of-dengue-and-12-cases-of-malaria-have-been-detected-in-the-taloja-navi-mumbai-construction-activities-and-stagnant-water-have-raised-health-concerns/
या कारवाईमुळे बोरिवली पश्चिम रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या नागरिकांना तसेच परिसरातील पादचाऱ्यांना अडथळामुक्त व अधिक मोकळे पदपथ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या कारवाईसाठी मुंबई महानगरपालिकेकडून 2 जेसीबी, 5 डंपर, 10 हून अधिक अधिकारी-कर्मचारी आणि 20 कामगार तैनात करण्यात आले होते. तसेच कारवाईदरम्यान आवश्यक पोलीस बंदोबस्तासाठी 15 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.