Home महाराष्ट्र नवी मुंबई नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; २६.३० कोटींचे ७२६ किलो ड्रग्स नष्ट!

नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; २६.३० कोटींचे ७२६ किलो ड्रग्स नष्ट!

0
नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; २६.३० कोटींचे ७२६ किलो ड्रग्स नष्ट!
Navi Mumbai

नवी मुंबई : अंमली पदार्थांच्या अवैध विक्री आणि तस्कराविरुद्ध नवी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी विविध २०१ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला तब्बल ७२६ किलो वजनाचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत सुमारे २६ कोटी ३० लाख रुपये इतकी आहे. बुधवारी, ३० सप्टेंबर रोजी तळोजा येथील ‘मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी’ या शासकीय अधिकृत प्रकल्पात कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून हा सर्व साठा जाळून नष्ट करण्यात आला. या कारवाईवेळी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, (Milind Bharmbe) सह पोलीस आयुक्त दीपक साकोरे, अप्पर पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे आणि पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

‘नशामुक्त नवी मुंबई’ मोहिमेला वेग

शहरातील ड्रग्सचे रॅकेट आणि अंमली पदार्थांची तस्करी पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून ‘नशामुक्त नवी मुंबई’ ही विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत अमली पदार्थ तस्करांवर कडक आणि नियोजनबद्ध कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

आतापर्यंत तब्बल १,००० किलोपेक्षा जास्त ड्रग्स नष्ट

या ताज्या कारवाईमुळे ‘नशामुक्त नवी मुंबई’ मोहिमेअंतर्गत पोलिसांनी आतापर्यंत नष्ट केलेल्या अंमली पदार्थांचा एकूण साठा १,००० किलोच्या पार गेला आहे. यापूर्वी पोलिसांनी १९२ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला १३ कोटी ४४ लाख रुपयांचा माल नष्ट केला होता. आता बुधवारी झालेल्या कारवाईनंतर पोलिसांनी आजवर नष्ट केलेल्या एकूण ड्रग्सची किंमत तब्बल ३९ कोटी ७४ लाख रुपयांवर पोहोचली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी ‘कॅम्पस कनेक्ट’ उपक्रम

केवळ कारवाईवर न थांबता तरुणाईला या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांनी ‘कॅम्पस कनेक्ट’ हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाद्वारे शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था (हाऊसिंग सोसायट्या) आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती सत्रे आयोजित केली जात आहेत. अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे भयंकर दुष्परिणाम विद्यार्थ्यांना पटवून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

माहिती देणाऱ्याचे नाव ठेवणार गुप्त; पोलिसांचे नागरिकांना आवाहन

अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीची माहिती पोलिसांपर्यंत सहज पोहोचावी यासाठी नवी मुंबई पोलीस दलाने एक विशेष हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे. नागरिक या हेल्पलाइनवर अमली पदार्थांशी संबंधित कोणतीही बातमी किंवा संशयित हालचालींची माहिती पूर्णपणे गुप्तपणे देऊ शकतात. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. तसेच, येत्या काळात अमली पदार्थ तस्करांविरोधात अधिक कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देत नागरिकांनी कोणत्याही भीतीशिवाय माहिती देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here