Home महाराष्ट्र नाशिक Nashik Crime : ‘माझे सांगणे पाळले नाही तर’…नाशिकमध्ये अघोरी पूजा ; जादूटोण्याची भीती घालत भोंदू महिलेने तरुणीशी केला स्वतःच्या मुलाचा साखरपुडा

Nashik Crime : ‘माझे सांगणे पाळले नाही तर’…नाशिकमध्ये अघोरी पूजा ; जादूटोण्याची भीती घालत भोंदू महिलेने तरुणीशी केला स्वतःच्या मुलाचा साखरपुडा

0
Nashik Crime : ‘माझे सांगणे पाळले नाही तर’…नाशिकमध्ये अघोरी पूजा ; जादूटोण्याची भीती घालत भोंदू महिलेने तरुणीशी केला स्वतःच्या मुलाचा साखरपुडा

Nashik Crime : अघोरी पूजा, उतारे आणि जादूटोण्याची भीती दाखवत धुळे येथील एका महिलेकडून सुमारे १ लाख ६० हजार रुपये उकळल्याचा आरोप समोर आला आहे. एवढेच नव्हे, तर पीडित महिलेच्या २१ वर्षीय मुलीला कुटुंबापासून दूर ठेवून तिचा संशयित मांत्रिक महिलेच्या मुलाशी जबरदस्तीने साखरपुडा केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात नाशिक येथील संशयित महिला सरिता मनोज जाधव आणि तिच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांना नाशिक येथून अटक केली आहे.

फिर्यादीनुसार, पीडित महिला धुळे येथे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. प्रकृती वारंवार बिघडत असल्याने तसेच आर्थिक अडचणींमुळे ती चिंतेत होती. याच दरम्यान तिच्या दोन परिचित महिलांनी तिची नाशिक येथील सरिता मनोज जाधव हिच्याशी ओळख करून दिली. जाधव हिने स्वतःकडे अघोरी पूजा आणि उतारे करण्याची शक्ती असल्याचे सांगून पीडित महिलेचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे.

अघोरी पूजेच्या नावाखाली पैशांची मागणी

संशयित महिलेने पीडितेच्या अंगावरून लिंबू फिरवणे, पाण्यात राख टाकून ते पिण्यास सांगणे तसेच पेढा खायला देणे असे प्रकार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. “माझे सांगणे पाळले नाही तर आणखी वाईट होईल,” अशी भीतीही दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर पीडितेच्या डोक्यातील केस उपटून स्मशानात पूजा करावी लागेल, असे सांगण्यात आले. अमावास्या आणि पौर्णिमेला नाशिक येथे उतारे करण्यासाठी तिला बोलावण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या विधीसाठी १ लाख ५१ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्यापैकी पीडित महिलेने १ लाख ३० हजार रुपये रोख दिल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.

https://www.prahaar.in/2026/09/29/accused-arrested-from-goa-by-nashik-rural-cyber-police-for-6-28-lakh-fraud-involving-an-apk-file/

नाशिकमध्ये नेऊन विधी केल्याचा आरोप

अमावस्येच्या दिवशी पीडित महिलेला नाशिकच्या गंगाघाट परिसरातील केवडीबन येथे नेण्यात आले. तेथे स्नान घालून लिंबू उतरवण्यात आला आणि त्याचा रस डोळ्यांत टाकण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर खोबरे व पेढा खायला देण्यात आला. त्यानंतर पीडितेला मळमळ आणि उलटी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर तिला मुंबई नाका परिसरातील एका घरी नेण्यात आले. तेथे काळे तीळ आणि राखेचा वापर करून अघोरी पूजा केल्याचा आरोप असून, यावेळी आणखी ३० हजार रुपये घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मांत्रिकाने स्वतःच्या मुलाशी लावला जबरदस्तीने साखरपुडा

या प्रकरणातील आणखी एक गंभीर आरोप म्हणजे पीडित महिलेच्या २१ वर्षीय मुलीला कुटुंबापासून दूर ठेवण्यात आल्याचा दावा. संशयित महिलेने पीडितेला तिच्या मुलीला धुळे येथील एका परिचित महिलेच्या घरी ठेवण्यास सांगितले. “चाळीस दिवस तिकडे जाऊ नका, तेथे दुष्ट शक्ती आहेत,” अशी भीती दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर पीडितेच्या मुलीचे संशयित महिलेच्या मुलाशी लग्न लावून दिल्यास संकट टळेल, असे सांगण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. पुढे मुलगी कुटुंबापासून दूर राहू लागली आणि तिचा संशयित महिलेचा मुलगा गणेश मनोज जाधव याच्याशी साखरपुडा करून घेतल्याचा आरोप आहे. काही काळानंतर मुलीचा कुटुंबीयांशी संपर्कही बंद करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने पोलिसांत तक्रार

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला. समितीचे कार्यकर्ते रणजित शिंदे, नवल ठाकरे, भूषण पाटील आणि नितीन बागूल यांनी पीडितेला पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी मदत केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर धुळे शहर पोलिस ठाण्यात जादूटोणा विरोधी कायदा आणि इतर लागू कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या मदतीने संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here