Jalgaon Accident: अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाजवळील रेल्वे उड्डाणपुलावर दुचाकीचा भीषण अपघात होऊन एका ज्योतिषाचा मृत्यू झाला. दुचाकी उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकल्यानंतर चालक पुलावरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात त्यांची मुलगी किरकोळ जखमी झाली. ही घटना २७ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. मृत व्यक्तीची ओळख विजय घनश्याम भार्गव ऊर्फ विजू महाराज (वय ४५, रा. केशव नगर, अमळनेर) अशी झाली आहे. ते अमळनेर शहरातील भृगु ज्योतिषी फर्ममध्ये ज्योतिषविशारद म्हणून कार्यरत होते.
https://www.prahaar.in/2026/09/28/dhule-crime-pregnant-womans-murder-by-burning-finally-solved-four-arrested-including-the-mastermind/
मुलीसोबत दुचाकीवरून जाताना अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, विजय भार्गव हे दुचाकी क्रमांक एमएच १९ बीई १०२९ वरून आपल्या मुलीसोबत शहराच्या दिशेने केशव नगरकडे जात होते. तत्वज्ञान केंद्राजवळ त्यांच्या दुचाकीला दुसऱ्या वाहनाने कट मारल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली. या धडकेत विजय भार्गव पुलावरून खाली पडले. खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत ते काही काळ घटनास्थळीच पडून होते. दरम्यान, त्यांची मुलगी रडत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच प्रकृती गंभीर
अपघाताची माहिती मिळताच विजय भार्गव यांच्या पत्नी तसेच प्रताप महाविद्यालयातील कर्मचारी प्रविण डबेलकर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी विजय भार्गव यांना रिक्षातून डॉ. अनिल शिंदे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे भार्गव कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दुचाकीला दुसऱ्या वाहनाने कट मारल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीत सांगितले जात आहे. या घटनेबाबत संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास करण्यात येत आहे.