Home ब्रेकिंग न्यूज Nitesh Rane : बदनापूर तालुक्यातील राजेवाडी तलावाला मंत्री नितेश राणे यांची भेट

Nitesh Rane : बदनापूर तालुक्यातील राजेवाडी तलावाला मंत्री नितेश राणे यांची भेट

0
Nitesh Rane : बदनापूर तालुक्यातील राजेवाडी तलावाला मंत्री नितेश राणे यांची भेट
Nitesh Rane

गाळ काढण्यासह संवर्धन तलावाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश

जालना : कमी पावसामुळे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील राजेवाडी तलावात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीची राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane)यांनी थेट घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी तलाव परिसराचा आढावा घेतला तसेच स्थानिक मच्छीमार बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या व अडचणी समजून घेतल्या. या पाहणी दौऱ्यावेळी मत्स्यआयुक्त भानुदास पालवे, सहआयुक्त (भूजल) ऋता दीक्षित, प्रादेशिक आयुक्त सुरेश भारती, सहाय्यक आयुक्त माधुरिमा जाधव यांच्यासह जलसंपदा आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मच्छीमार बांधवांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन

चालू वर्षात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने राजेवाडी तलावातील पाणीपातळी तळाला गेली आहे. याचा थेट फटका स्थानिक मत्स्यव्यवसायाला बसला असून मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मच्छीमारांनी आपल्या विविध मागण्या आणि अडचणी मंत्री नितेश राणे यांच्यासमोर मांडल्या. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, राज्य शासनाच्या माध्यमातून मच्छीमार बांधवांना सर्वतोपरी मदत मिळवून दिली जाईल आणि अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असा विश्वास मंत्र्यांनी दिला.

तलावातील गाळ काढणे आणि ‘संवर्धन तलावा’चा प्रस्ताव

राजेवाडी तलावाची पाणीसाठवण क्षमता पूर्ववत करण्यासाठी सिंचन व पाटबंधारे विभागाने तातडीने तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घ्यावे, असे स्पष्ट निर्देश नितेश राणे यांनी दिले. तसेच, तलावात वारंवार होणाऱ्या पाणीकपातीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून भविष्यातील पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी ‘संवर्धन तलाव’ उभारण्याचा सविस्तर प्रस्ताव विनाविलंब शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.

https://www.prahaar.in/2026/09/28/we-want-to-become-officers-just-give-us-teachers-childrens-bottle-microphone-appeal-gets-the-administrations-attention/

कंत्राटदारांच्या मनमानीवर कारवाईचे आदेश

तलाव परिसरात मुरूम उत्खनन करताना काही कंत्राटदारांकडून काढलेला टाकाऊ गाळ आणि माती थेट तलावातच टाकली (डम्पिंग) जात असल्याचे या पाहणी दरम्यान उघडकीस आले. या प्रकारामुळे तलावाचे आकारमान आणि पाणीसाठवण क्षमता कमालीची घटली आहे. या गंभीर बाबीची दखल घेत पाटबंधारे विभागाने तात्काळ या जागेची पाहणी करावी आणि दोषी कंत्राटदारांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश मंत्र्यांनी दिले.

‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’चा लाभ घेण्याचे आवाहन

राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय आधुनिक करण्यासाठी राज्य सरकार विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक मच्छीमार बांधवांनी ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’चा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी शेवटी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here