बॉलिवूड अभिनेता आणि फिल्म निर्माता यशपाल शर्मा यांचा सख्खा भाऊ राजेश कुमार याला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना हरियाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडलय. हिसार येथे ही कारवाई करण्यात आली असून, राजेश कुमार यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय कामासाठी मागितली लाच
राजेश कुमार हे जल सेवा मंडळात सहाय्यक महसूल लिपिक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. राजगड-चंदीगड महामार्गालगतच्या शेतजमिनीवर विकसित करण्यात आलेल्या वसाहतीसाठी कालव्याच्या पाण्याद्वारे सिंचनाची व्यवस्था करण्यासंदर्भातील प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत हरियाणा एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या हिसार पथकाने स्वतंत्र साक्षीदारांच्या उपस्थितीत सापळा रचला.
https://www.prahaar.in/2026/09/26/the-song-bhabhi-tabahi-from-yami-gautams-film-nayi-naveli-has-been-released-is-she-a-sister-in-law-or-a-witch/
3 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात अटक
तक्रारीनुसार, संबंधित शासकीय प्रक्रिया पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी राजेश कुमार यांनी तक्रारदाराकडे 3 हजार रुपयांची लाच मागितली होती. ठरल्याप्रमाणे रक्कम स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने राजेश कुमार यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 मधील कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
नेमक्या कोणत्या कामासाठी मागितली होती लाच ?
एसीबीचे तपास अधिकारी नरेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्य नगर येथील रहिवासी राकेश कुमार यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. त्यांच्या गावातील राजगड-चंदीगड महामार्गालगतच्या शेतजमिनीवर एक वसाहत विकसित करण्यात आली होती. या वसाहतीसाठी कालवा सिंचन प्रणालीशी संबंधित कमांड एरिया ऑथोरायझेशन (CAA) मिळवण्यासाठी हिसार कालवा विभागाकडे अर्ज करण्यात आला होता. या प्रकरणाची जबाबदारी राजेश कुमार यांच्याकडे असल्याचे तपासात समोर आले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधित प्रक्रिया पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी राजेश कुमार यांनी 3 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर एसीबीच्या हांसी उपकेंद्रातील पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.
यशपाल शर्मा कोण आहेत ?
राजेश कुमार हे बॉलिवूड अभिनेता यशपाल शर्मा यांचे भाऊ आहेत. यशपाल शर्मा यांनी बॉलिवूडसह हरियाणवी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. अभिनयासोबतच ते चित्रपट निर्मितीशीही जोडले गेले आहेत. ‘दादा लखमी’ या चर्चेत राहिलेल्या चित्रपटाच्या निर्मितीशीही त्यांचा संबंध आहे. दरम्यान, राजेश कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एसीबीकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.