Nashik Ganesh Visarjan 2026 : गणेशोत्सवाच्या विसर्जनानंतर नाशिक महानगरपालिकेच्या सहाही विभागांतून आज दुपारी एक वाजेपर्यंत तब्बल ९ हजार ६४१ गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले आहे. यामध्ये ९ हजार ६५ पीओपीच्या, तर ५७६ शाडू मातीच्या मूर्तींचा समावेश आहे. संकलित मूर्तींच्या आकडेवारीवरून पीओपी मूर्तींचे प्रमाण शाडू मातीच्या मूर्तींपेक्षा मोठे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुपारपर्यंत ९ हजार ६४१ गणेशमूर्ती संकलित
महापालिकेच्या विभागनिहाय आकडेवारीनुसार, पंचवटी विभागातून सर्वाधिक ३ हजार ८४४ मूर्ती संकलित करण्यात आल्या. त्यानंतर नवीन नाशिक विभागातून १ हजार ८७१, नाशिक पूर्व विभागातून १ हजार २३६, नाशिक पश्चिम विभागातून १ हजार १५८, सातपूर विभागातून ६०९, तर नाशिक रोड विभागातून ३८४ गणेशमूर्ती संकलित करण्यात आल्या. संकलित झालेल्या पीओपी मूर्तींपैकी ९ हजार ६५ मूर्ती सहा फुटांपेक्षा कमी आकाराच्या आहेत. सहा फुटांपेक्षा मोठ्या पीओपी मूर्तींची नोंद झालेली नाही. तर शाडू मातीच्या ५७६ मूर्ती संकलित झाल्या असून, या सर्व मूर्ती सहा फुटांपेक्षा कमी आकाराच्या आहेत.
https://www.prahaar.in/2026/09/25/nashik-ganesh-visarjan-2026-bhadrakali-dominates-nashiks-ganesh-visarjan-procession-official-order-of-25-mandals-announced/
पुढील प्रक्रियेचे महापालिकेसमोर आव्हान
विसर्जनानंतर संकलित करण्यात आलेल्या हजारो गणेशमूर्तींची विल्हेवाट आणि पर्यावरणपूरक पद्धतीने प्रक्रिया करण्याचे आव्हान आता महापालिकेसमोर आहे. विशेषतः पीओपी मूर्तींचे प्रमाण मोठे असल्याने त्यांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, गणेश विसर्जनाची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याने दुपारी एकनंतर संकलित होणाऱ्या गणेशमूर्तींच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम आकडेवारीत बदल होण्याची शक्यता आहे.