Home क्राईम Dhule Crime News : शेती विभागात काम करताना शिक्षा बंदी फरार, धुळे जिल्हा कारागृहात खळबळ

Dhule Crime News : शेती विभागात काम करताना शिक्षा बंदी फरार, धुळे जिल्हा कारागृहात खळबळ

0
Dhule Crime News : शेती विभागात काम करताना शिक्षा बंदी फरार, धुळे जिल्हा कारागृहात खळबळ

Dhule Crime News : धुळे जिल्हा कारागृहातून शिक्षा भोगत असलेला एक बंदी कारागृहाच्या शेती विभागात काम करत असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांची नजर चुकवून फरार झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कारागृह प्रशासनात खळबळ उडाली. फरार बंदीचा शोध घेण्यासाठी पोलिस आणि कारागृह प्रशासनाकडून संयुक्त शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

शेती विभागात कामासाठी गेला अन्…

फरार बंदीचे नाव दया ऊर्फ कृष्णा अशोक वाघ असून, त्याचा बंदी क्रमांक सी/११७ आहे. तो मागील वर्षभरापासून कारागृहाच्या मालकीच्या शेती विभागात नियमितपणे काम करत होता. बुधवारी सकाळी त्याला इतर दहा शिक्षा बंद्यांसोबत कारागृहाबाहेरील शेती विभागात कामासाठी नेण्यात आले होते. दुपारी सुमारे दोन वाजता बंद्यांची उपस्थिती तपासली असता कृष्णा वाघ हा तेथे नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्याचा परिसरात शोध घेण्यात आला. मात्र, तो आढळून न आल्याने कारागृह प्रशासनाने तातडीने धुळे शहर पोलिसांना माहिती दिली.

https://www.prahaar.in/2026/09/24/nagpur-crime-a-minor-quarrel-between-children-ends-in-bloodshed-36-year-old-man-dies-after-being-attacked-with-an-iron-rod/

पोलिसांची विविध पथके सक्रिय

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम २६२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार बंदीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तैनात केली असून, शहरातील प्रमुख मार्ग, बसस्थानक आणि इतर संभाव्य ठिकाणी तपास सुरू आहे. तसेच बंदीचे वर्णन आणि आवश्यक माहिती जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांनाही देण्यात आली आहे. बसस्थानके, रेल्वे स्थानके, प्रमुख चौक आणि जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या मार्गांवरही पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे.

मुख्य रस्त्यालगत शेती विभाग

कारागृहाच्या मालकीचा शेती विभाग धुळे शहरातील रहदारीच्या परिसरात असून, त्याच्या जवळ मुख्य रस्ता आणि बसस्थानक आहे. या गर्दीच्या परिसराचा फायदा घेत बंदीने कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पलायन केले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, बंदी नेमका कोणत्या मार्गाने आणि कशा पद्धतीने फरार झाला, याचा तपास सुरू आहे.

सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी

घटनेनंतर शेती विभागात बंद्यांच्या सुरक्षेसाठी किती कर्मचारी तैनात होते, नियमित हजेरी आणि देखरेख कशी केली जात होती, तसेच सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याची चौकशी कारागृह प्रशासनाकडून केली जात आहे. कर्तव्यात कसूर झाल्याचे आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. धुळे जिल्हा कारागृह वर्ग-१चे अधीक्षक ई. जी. शिंदे यांनी संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आल्याचे सांगितले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिक दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here