अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गुलाल उधळल्यामुळे तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. विसर्जन मिरवणुकीत पोलिसांकडून तरुणांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेत शुक्लेश्वर तरुण गणेश मंडळाचे सदस्य दीपक वाघस्कर यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिंगार परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना अचानक पोलिसांनी काही गणेशभक्तांवर सौम्य लाठीचार्ज केला. या कारवाईचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी कोणतेही स्पष्ट कारण नसताना लाठीचार्ज केला, असा आरोप त्यांनी केला आहे.
https://www.prahaar.in/2026/09/23/andheriteel-swapnakshay-mitra-mandal-once-again-tops/
पोलीस अधीक्षकांची भिंगार विसर्जनावर वक्तव्य
भिंगार येथील गणेश विसर्जन मिरवणुकीतील लाठीचार्ज आणि दीपक वाघस्कर यांच्या मृत्यूचा थेट संबंध नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सांगितले आहे. मिरवणुकीत ट्रॅक्टरवर नाचणाऱ्या तरुणांना सुरक्षेच्या कारणास्तव खाली उतरवताना पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न रात्री 9:05 वाजता झाला. तर वाघस्कर यांची प्रकृती 9:25 ते 10 वाजेदरम्यान बिघडल्याने दोन्ही घटना वेगवेगळ्या असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. वाघस्कर तेथे उपस्थित असल्याचे व्हिडिओत दिसत नसून, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून अंतिम कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल.
गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही…
घटनेनंतर भिंगार परिसरातील गणेश विसर्जन मिरवणुका काही काळ थांबवण्यात आल्या. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई होईपर्यंत नगर शहरातील गणेश विसर्जन होऊ देणार नाही, अशी भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी घेतली आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, विसर्जन मिरवणुकीबाबत पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.