Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीला उलट्या झाल्यानंतर अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर तिला तातडीने अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. विद्यार्थिनीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात येणार असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
कुटुंबीयांचा आक्रोश
मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच तिचे आई-वडील आणि नातेवाईक अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. घटनेची माहिती मिळताच अक्कलकुवा उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी रुग्णालयात पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
https://www.prahaar.in/2026/09/23/crime-news-district-kesari-wrestler-murdered-in-the-middle-of-the-road/
दहा दिवसांत तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची नोंद
दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या घटना समोर आल्याने आरोग्य आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दुर्गम भागातील आरोग्य सुविधा, रस्ते, वाहतूक आणि आरोग्य केंद्रांमधील उपलब्ध सुविधांबाबत यापूर्वीही तक्रारी होत आल्या आहेत. जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात रुग्णांना वेळेत आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचवताना अडचणी येत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र, अक्कलकुवा नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनीच्या या घटनेचा मृत्यूशी या सुविधांचा थेट संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर पुन्हा एकदा जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. मात्र, या विद्यार्थिनीच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.