Nashik : प्रशासन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि परिणामकारक करण्यासाठी प्रत्येक विभागाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून त्याचे योग्य पद्धतीने दस्तऐवजीकरण करावे. उपक्रम राबविण्याबरोबरच त्याचा नागरिकांना झालेला प्रत्यक्ष लाभ आणि परिणाम स्पष्टपणे मांडणे आवश्यक आहे, असे आवाहन प्रभारी विभागीय आयुक्त आयुष प्रसाद यांनी केले.
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीला विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी तसेच विविध विभागांचे प्रशासकीय प्रमुख उपस्थित होते. प्रशासनातील कार्यपद्धतीत सुधारणा, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, सेवांची गुणवत्ता वाढविणे आणि नागरिकांना अधिक चांगल्या सेवा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाचा प्रत्यक्ष कृती कालावधी 20 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर असा आहे.या अभियानात कार्यालयीन व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण, ई-गव्हर्नन्स, संसाधनांचा प्रभावी वापर, तंटा व तक्रारमुक्त कार्यालये तसेच नावीन्यपूर्ण आणि पथदर्शी उपक्रम या बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे.
https://www.prahaar.in/2026/09/22/nashik-crime-newsorders-issued-for-godman-kharat-and-five-other-suspects-to-appear-in-court-today/
प्रभावी दस्तऐवजीकरण गरजेचे
आयुष प्रसाद यांनी सांगितले की, एखादा चांगला उपक्रम राबविल्यानंतर त्यामागील संकल्पना, अंमलबजावणीची पद्धत आणि नागरिकांना झालेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा याची व्यवस्थित नोंद ठेवणे गरजेचे आहे. अशा उपक्रमांचे प्रभावी दस्तऐवजीकरण झाल्यास इतर कार्यालयांनाही त्याची पुनरावृत्ती करणे सोपे होईल.अभियानांतर्गत विविध विभागांच्या कामांचे मूल्यांकन करताना उपक्रमाची अनुकरणीयता, सहज अंमलबजावणी, परिणामांचे परिमाणात्मक मूल्यमापन, इतर स्तरांवर अंमलबजावणीची शक्यता, नागरिकांना होणारा लाभ आणि एकूण परिणामकारकता या निकषांचा विचार केला जाणार आहे.
यासाठी तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर निवड समित्यांची रचना करण्यात आली असून, विविध स्तरांवर उत्कृष्ट कामांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे विभागातील सर्व कार्यालयांनी आपल्या उल्लेखनीय आणि नावीन्यपूर्ण कामांची माहिती पुराव्यांसह संकलित करून प्रभावी सादरीकरणासाठी तयार ठेवावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.