Home देश IIT Bombay student suicide : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी आत्महत्या प्रकरण : डीन प्रा. सूर्यनारायण दुल्ला निलंबित; संस्थेकडून माफीनामा जारी

IIT Bombay student suicide : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी आत्महत्या प्रकरण : डीन प्रा. सूर्यनारायण दुल्ला निलंबित; संस्थेकडून माफीनामा जारी

0
IIT Bombay student suicide : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी आत्महत्या प्रकरण : डीन प्रा. सूर्यनारायण दुल्ला निलंबित; संस्थेकडून माफीनामा जारी
IIT Bombay student suicide

मुंबई : आयआयटी मुंबईतील (IIT Bombay) ‘ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी’ विभागाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेत आयआयटी मुंबईचे संचालक शिरीष केदारे यांनी डीन प्रा. सूर्यनारायण दुल्ला (Suryanarayan Dulla) यांना तातडीने पदावरून निलंबित केले आहे. याशिवाय, घटनेनंतर लगेचच घाईघाईत काढलेले आपले आधीचे वक्तव्य मागे घेत प्रशासनाने अधिकृत माफीनामा जारी केला आहे. दरम्यान, संचालक केदारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा अफवा असल्याचे सांगत संस्था प्रशासनाने ते कार्यरत असल्याचे स्पष्ट केले.

प्रशासनाकडून दिलगिरी आणि जुन्या निवेदनावरून माघार

साहिलच्या निधनानंतर आयआयटी प्रशासनाने घाईघाईत केलेल्या वक्तव्यांवरून तीव्र खेद व्यक्त केला आहे. कोणतीही अधिकृत चौकशी पूर्ण होण्याआधीच घटनेबाबत निष्कर्ष काढणे आणि चुकीची माहिती देणे अयोग्य होते, असे संस्थेने मान्य केले. “साहिलच्या आत्महत्येप्रकरणी आधी काढलेल्या पत्रकातील माहितीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच घटनेची कारणे मांडणे अनुचित होते,” असे स्पष्टीकरण आयआयटीने दिले आहे.

काय होता आधीचा दावा आणि वाद ?

१८ सप्टेंबर रोजी मध्य-सत्र परीक्षेदरम्यान साहिलने टोकाचे पाऊल उचलले होते. या घटनेनंतर १९ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या सुरुवातीच्या निवेदनात आयआयटीने असा दावा केला होता की, साहिल परीक्षेदरम्यान मोबाईलवर ‘चॅटजीपीटी’चा वापर करताना पकडला गेला होता. त्याला केवळ समुपदेशन करून कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे आश्वासन देण्यात आले होते, असे प्रशासनाने म्हटले होते. मात्र, पोलीस तपास सुरू असतानाच विद्यार्थ्यावर आरोप केल्यामुळे आयआयटी प्रशासनावर चौफेर टीका झाली होती.

फॅकल्टी फोरमकडून प्राध्यापकांचे समर्थन

दुसऱ्या बाजूला, ‘आयआयटी मुंबई फॅकल्टी फोरम’ने निलंबित प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. फोरमच्या दाव्यानुसार, १८ सप्टेंबर रोजी परीक्षेदरम्यान देखरेख करताना प्राध्यापकांना विद्यार्थ्याकडे मोबाईल आढळला होता. त्यांनी केवळ संस्थेच्या नियमांनुसार वरिष्ठांकडे तक्रार केली होती. आपले कर्तव्य बजावणाऱ्या प्राध्यापकाची विनाकारण बदनामी केली जात असल्याबद्दल फॅकल्टी फोरमने नाराजी व्यक्त केली असून साहिलच्या कुटुंबाबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत.

जातीवाचक छळाचे आरोप अन् चौकशी क्राईम ब्राँचकडे

या संपूर्ण घटनेला आता गंभीर वळण मिळाले असून मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास ‘क्राईम ब्राँच’कडे सोपवला आहे. मृत साहिलच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून प्रा. दुल्ला हे साहिलला जातीवाचक शिवीगाळ करत होते आणि त्याचा मानसिक छळ करत होते. या गंभीर आरोपांनंतर पोलिसांनी प्रा. दुल्ला यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला असून क्राईम ब्राँच या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here