स्वीडन : अहमदनगरमधील विखे पाटील कुटुंबातील कन्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत रिक्सदाग खासदार म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्रातील सहकार आणि राजकीय क्षेत्राशी जोडलेल्या कुटुंबातील या कन्येने स्वीडिश राजकारणात मिळवलेले हे यश कौतुकास्पद मानले जात आहे.
https://www.prahaar.in/2026/09/20/that-movie-a-podcast-and-honeymoon-plans-how-did-siya-finish-off-ketan-at-lohagad-the-chilling-inside-story-of-the-murder/
नीला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला असला तरी त्यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण काही काळ अहमदनगर येथे झाले. त्यांचे वडील डॉ. अशोक विखे पाटील व्यावसायिक कारणांमुळे स्वीडनमध्ये स्थायिक झाले होते. नीला यांनी नंतर स्वीडन, स्पेन आणि युरोपमधून उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांनी गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायद्याची पदवी घेतली, तर माद्रिद येथील विद्यापीठातून एमबीए केले. त्यांना इंग्रजी, स्वीडिश आणि स्पॅनिश या भाषा उत्तम बोलता येतात.
राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान कार्यालयात वित्त, करप्रणाली आणि गृहनिर्माण या विषयांवर सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. तसेच स्टॉकहोम सिटी कौन्सिल आणि ग्रीन पार्टीमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. अवघ्या १६ व्या वर्षी त्यांनी सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचे सदस्यत्व घेतले होते. संसदेत निवडून आल्यानंतर आता बालकल्याण आणि पर्यावरणाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आपल्या या यशाबद्दल बोलताना त्यांनी आजोबा बाळासाहेब विखे पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. लहानपणीच आजोबांनी आपल्याला राजकारणाची आणि अर्थकारणाची आवड निर्माण करून दिली होती, असे त्या म्हणाल्या. स्वीडनमध्ये राहत असल्या तरी भारताशी आणि महाराष्ट्राशी आपले नाते नेहमीच खास राहिले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
स्वीडनमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विरोधी डाव्या पक्षांच्या आघाडीने निसटते बहुमत मिळवले आहे. ३४९ जागांच्या या संसदेत विरोधी आघाडीला १७६ जागा मिळाल्या आहेत. या राजकीय बदलांनंतर नीला विखे पाटील आता स्वीडनच्या संसदेत लोकप्रतिनिधी म्हणून कार्यभार सांभाळतील.