मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरातील दळणवळणाची व्यवस्था अखंड आणि एकीकृत करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने विविध ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित केले आहे. या अंतर्गत भायखळा येथील सीताराम सिलम उड्डाणपूल (वाय ब्रिज) ते कुतुब – ए – कोंकण मखदूम अली माहिमी उड्डाणपूल (जे.जे. उड्डाणपूल) यांना जोडणा-या जे.जे. मार्ग आणि साबू सिद्दीकी तंत्रनिकेतन महाविद्यालय जंक्शन येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामध्ये मुख्य केबल – स्टे पूल व वायाडक्ट तसेच पूर्व आणि पश्चिम बाजूस जोडणाऱ्या फ्लायओव्हर आर्म्सचा समावेश आहे.या पुलाचे काम २२ टक्के पूर्ण झाले असून मे २०२८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
https://www.prahaar.in/2026/09/17/grand-ganesh-visarjan-ceremony-now-in-a-scaled-down-format-girgaon-chowpatty-display-draws-attention/
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रकल्पस्थळास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच, सविस्तर आढावा घेत विविध निर्देश दिले. सर्वसमावेशक वाहतूक गतिशीलता आराखड्यानुसार या उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. उड्डाणपुलाच्या मुख्य केबल – स्टे व वायाडक्ट भागाची एकूण रचना २ अधिक २ लेन स्वरूपाची आहे. केबल – स्टे भागाची लांबी सुमारे २३० मीटर, तर वायाडक्टची लांबी ३१२ मीटर आहे. या भागाची रुंदी १६.५ मीटर असून, डाव्या बाजूचा अप रॅम्प २०५ मीटर बाय ५.२५ मीटर, तर उजव्या बाजूचा अप रॅम्प २१३ मीटर बाय ५.२५ मीटर आहे. या संरचनेच्या बांधकामामध्ये आरसीसी तसेच स्ट्रक्चरल स्टेनलेस स्टील या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलाची संरचनात्मक मजबुती, टिकाऊपणा आणि दीर्घकालीन वापराच्या दृष्टीने आवश्यक तांत्रिक मानके साध्य करण्यास मदत होणार आहे.
मुख्य उड्डाणपुलाला जोडण्यासाठी पूर्व आणि पश्चिम दिशेला फ्लायओव्हर आर्म्स विकसित करण्यात येत आहेत. हे आर्म्स १ अधि १ लेन स्वरूपाचे असतील. पश्चिम बाजूच्या फ्लायओव्हर आर्मची लांबी सुमारे २९० मीटर, तर पूर्व बाजूच्या फ्लायओव्हर आर्मची लांबी सुमारे ३५० मीटर आहे. दोन्ही बाजूंच्या फ्लायओव्हर आर्मची रुंदी ८.५ मीटर असून, त्यांच्या बांधकामासाठीही आरसीसी आणि स्ट्रक्चरल स्टेनलेस स्टील या संरचनात्मक पद्धतींचा वापर करण्यात येणार आहे. मुख्य केबल – स्टे पूल, वायाडक्ट आणि दोन्ही बाजूंचे फ्लायओव्हर आर्म्स यांची एकत्रित रचना केल्यामुळे विविध दिशांनी येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीचे अधिक प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे.
https://www.prahaar.in/2026/09/17/fda-suspends-licences-of-olympia-coffee-house-nair-hospital-canteen-over-food-safety-violations/
या पूल प्रकल्पाचा निर्धारित कालावधी पावसाळा वगळून २६ महिने म्हणजेच मे २०२८ अशी आहे. सद्यस्थितीत अंमलबजावणीच्या टप्प्यात असलेल्या पूल प्रकल्पाची भौतिक प्रगती २२ टक्के आहे. तथापि, निर्धारित कालावधीपूर्वी प्रकल्प पुर्ततेसाठी कामाचे प्रभावी नियोजन करावे. आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्रीची उपलब्धता तसेच विविध विभागांमध्ये योग्य समन्वय साधावा. नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी वाहतूक व्यवस्थापन व सुरक्षिततेच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.
प्रस्तावित उड्डाणपुलामुळे सर जमशेटजी जीजीभाई मार्गासह भायखळा – नागपाडा – माझगाव या दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या वाहतूक पट्ट्यातील जंक्शनवरील कोंडी कमी करण्यास मदत होणार आहे. तसेच, प्रवासाचा वेळ कमी होण्यास, पूर्व – पश्चिम व उत्तर – दक्षिण दिशेने होणाऱ्या वाहतुकीचा सुरळीत प्रवाह सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे. प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्यासह संबंधित अभियंता, अधिकारी उपस्थित होते.